फलटण{नसीर शिकलगार} – फलटण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकमेकांचे पारंपारिक विरोधक दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यामध्ये अतिशय जोरदार अस्तित्वाची लढाई होत आहे. मतदानाला अवघे तीन दिवस बाकी राहिले असताना दिवसेंदिवस रंगत वाढत चाललेली आहे. अनेकांनी नगराध्यक्ष कोण होणार यासाठी पैजा पण लावलेल्या आहेत.
फलटण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद खुले राहिल्याने व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून द्यायचा असल्याने या प्रतिष्ठित पदासाठी फलटणमधील पारंपारिक विरोधक नाईक निंबाळकर घराण्यातच दुरंगी थेट लढत होत आहे. या लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गेली 30 वर्ष फलटण नगरपालिकेवर वर्चस्व ठेवणारे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहे तर माजी खासदार स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर हे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाची ताकद वाढत चाललेली आहे.विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार सचिन पाटील यांना निवडून आणले. विधानसभा झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी खासदार गटांमध्ये प्रवेश केल्याने दिवसेंदिवस पक्षाची ताकद वाढत चालली आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजे गटाच्या अनेक दिग्गजानी राजे गटाची साथ सोडलेली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर राजेंगट लढत आहे. नव्याने गटाची बांधणी सुरू आहे. अशा परिस्थितीत फलटण नगरपालिकेची निवडणूक दोन्हीही नाईक निंबाळकर घराण्याची अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. राजे गटामधील अनेक दिग्गज सोडून गेले असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नगरपालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन स्वतः प्रचाराच्या रिंगणात ते या वयात उतरले आहेत. प्रारंभी एकतर्फी वाटणारी नगरपालिकेची निवडणूक आमदार रामराजे नाईक निंबाळकर रिंगणात उतरल्याने अत्यंत चुरशीची झालेली आहे. मध्यंतरी वीस दिवसांनी निवडणूक पुढे गेल्यामुळे राजे गटाने याचा चांगला फायदा उचलला आहे.त्यांनी कार्यकर्त्यांची जुळणी केली आहे. दुसरीकडे खासदार गटाने सुद्धा चांगले नियोजन केलेले आहे. प्रत्येक प्रभागावर लक्ष ठेवण्यासाठी प्रभारी नेमले आहेत. प्रभारी दररोज मतदार संघाचा आढावा घेत आहेत.दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झालेले आहेत. एकमेकांचे वाभाडे काढले जात असल्याने सर्वांच्याच प्रचार सभांना गर्दी होत आहे.
राजे गटाची प्रचाराची धुरा स्वतः रामराजे सोबत त्यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांची मुले सांभाळत आहेत. तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, शिवरूपराजे खर्डेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौं जिजामाला नाईक निंबाळकर,सौ मनीषाताई नाईक निंबाळकर हे भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. स्वतः अनिकेतराजे व समशेरसिंह नाईक निंबाळकर आपापल्या कार्यकर्त्यांसोबत तसेच त्या त्या प्रभागातील उमेदवार सोबत प्रत्येक घर पिंजून काढत आहेत ज्याची कोणाची नाराजी आहे ते दूर करत आहेत. प्रत्येक जण मतदारापर्यंत पोहोचल्याने ज्याला त्याला विजयाचा आत्मविश्वास वाटत आहे. मात्र मतदार चतुर झाला असून प्रत्येक उमेदवाराचे ते चांगल्या पद्धतीने स्वागत करत आहे तसेच उमेदवाराच्या प्रमाणेच गोड गोड बोलत आहे. त्यामुळे मतदारांचा अंदाज कोणालाच येईनासा झाला आहे. अनिकेतराजेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली आहे तर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे.
फलटण नगरपालिकेचे निवडणूक विशेषता नगराध्यक्ष पदाची निवडणूक दोन्ही नाईक निंबाळकर घराण्याची प्रतिष्ठेची लढाई झालेले आहे या लढाईकडे मतदारांबरोबरच राजकीय नेते मंडळीचे सुद्धा लक्ष लागले आहे. निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे मताधिक्य मात्र चुरशीच्या लढतीमुळे कमी प्रमाणात असणार आहे हे मात्र निश्चित.