काळज{वसीम इनामदार }- फलटण नगरपालिकेत मुस्लिम समाजाला स्वीकृत सदस्याच्या माध्यमातून माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी मुस्लिम समाजातुन होत आहे.
लोकनेते कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी सर्वच समाजाप्रमाणे मुस्लिम समाजाला सुद्धा भरभरून प्रेम दिले. नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे राहिले. हीच परंपरा पुढे चालवत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी इतर समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजावर सुद्धा नेहमीच प्रेम केले. हे कुटुंब फलटण शहरातील गोरगरीब मुस्लिम समाजाची गेली अनेक वर्षापासून ईद साजरी करत आहेत, दिवाळी साजरी करत आहेत. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होत असतात.
रणजितदादा व समशेरदादा यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या प्रेमामुळे व विकास कामांमुळे आज त्यांच्यावर फलटण शहरातील मुस्लिम समाजाचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचीच पोहोच पावती म्हणून फलटण शहरातील मुस्लिम समाजाने मागील झालेल्या काही निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना मोठी साथ दिली आहे.
आताच झालेल्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत रणजितदादांनी मुस्लिम समाजावर असलेल्या प्रेमापोटी समाजातील तीन उमेदवारांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देऊन समाजाला नेतृत्व करण्याची मोठी संधी दिली हे ऋण मुस्लिम समाज कधी विसरणार नाही.
परंतु काही मतांच्या फरकाने या तिन्ही उमेदवारांचा निसटता पराभव झाला. हा पराभव मुस्लिम समाजाला खूप मोठ्या वेदना देणारा आहे. आणि ज्याप्रमाणे मुस्लिम समाजाला वेदना होत आहेत त्याच वेदना नक्कीच नेतृत्वाला सुद्धा होत असतील याची जाणीव मुस्लिम समाजाला नक्कीच आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरात व तालुक्यात मुस्लिम समाजासाठी अनेक विकास कामे मंजूर करून आणली आहेत. सतत मुस्लिम समाजातील गोरगरीब लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाच्या नेहमीच पाठीशी उभे राहत असतात. त्यामुळे इथून पुढे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रणजितदादा, समशेरदादा व आमदार सचिन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यात काही शंका नाही.
फलटण शहराच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात मुस्लिम समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
हा समाज बहुसंख्येने मेहनतीचा, कष्टाळू आणि स्वाभिमानाने जगणारा आहे. प्रामुख्याने छोटे-छोटे व्यवसाय, कष्टाची कामे आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर आपला उदरनिर्वाह करणारा आहे.
किराणा दुकाने, हातगाडे, फळ-भाजी विक्री, हॉटेल व्यवसाय, कारागिरी, सेवा क्षेत्र—या सर्व ठिकाणी मुस्लिम समाजाचे योगदान दिसून येते. मर्यादित साधनसंपत्ती असूनही शहराच्या अर्थकारणाला चालना देण्याचे काम कधी तक्रार न करता मुस्लिम समाज सातत्याने करत आहे. हीच गोष्ट या समाजाच्या प्रामाणिकपणाची आणि सहनशीलतेची साक्ष देते.
मुस्लिम समाज हा शांतताप्रिय, कायद्याचा सन्मान करणारा आणि सामाजिक सलोखा जपणारा समाज आहे. कोणताही सण असो किंवा संकटाची वेळ—फलटण शहरात सर्व समाजघटकांबरोबर एकोप्याने उभे राहण्याची भूमिका मुस्लिम समाजाने कायम घेतली आहे.
फलटण नगरपालिकेच्या हद्दीत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, व्यापारी सुविधा अशा मूलभूत प्रश्नांचा सामना हा समाज रोज करत आहे. मात्र, नगरपालिकेच्या निर्णयप्रक्रियेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व अपुरे असल्याने समाजातील अनेक प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
नगरपालिका ही शहराच्या विकासाची केंद्रबिंदू असलेली संस्था आहे. येथे निवडून येणारे नगरसेवकच नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवतात. मुस्लिम समाजातील जाणकार, शिक्षित, समाजभान असलेले आणि विकासाची दृष्टी असलेले अनेक कार्यकर्ते आजही समाजात कार्यरत आहेत. त्यांना नगरसेवक पदाची संधी दिल्यास ते केवळ मुस्लिम समाजाच्याच नव्हे, तर संपूर्ण प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी जबाबदारीने काम करतील. आज गरज आहे ती या समाजाला फक्त मतदार म्हणून नव्हे, तर निर्णयप्रक्रियेचा भाग म्हणून पुढे आणण्याची.
सर्व समाजघटकांबरोबर एकोप्याने राहणे ही या समाजाची ओळख आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला नगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळणे म्हणजे सामाजिक ऐक्य अधिक बळकट होणे आणि लोकशाही मूल्यांना मजबुती मिळणे होय.
खऱ्या अर्थाने लोकशाही तेव्हाच सशक्त होते, समाजाचा खरा विकास तेव्हाच होतो, जेव्हा प्रत्येक घटकाला समान सन्मान आणि संधी मिळते.
फलटण नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी मुस्लिम समाजाला संधी देणे म्हणजे न्याय्य प्रतिनिधित्व, समावेशक विकास आणि फलटण शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरेल.
त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुस्लिम समाजासाठी मंजूर करूण आणलेल्या विकास कामांचा पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावण्यासाठी, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेत मुस्लिम समाजातील गोरगरीब लोकांच्या अनेक प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, विकास कामे तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, मुस्लिम समाजातील समाजसेवेची आवड असणाऱ्या, समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या काही नेतृत्वांना पुढील पाच वर्षात संधी मिळावी अशी मागणी फलटण शहर मुस्लिम समाजाच्या वतीने होत आहे.