फलटण – फलटण नगरपालिका निवडणूक अखेरच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत पोचली असून मतदारांना विविध प्रलोभने दाखविले जात आहेत. अनेकांनी मतदारांना सहलीवर नेले असून काहींना भेटवस्तू देणे,जेवणावळी देणे असे प्रकार सुरू आहेत. आचारसंहितेचा उघड भंग होत असताना प्रशासन व निवडणूक आयोग मुके आंधळे, बहिरे झाले आहे. त्यांनी आळीमिळी गुपचिळीची भुमिका घेतली आहे.
फलटण नगरपालिकेचे निवडणूक अंतिम टप्प्यात अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. अनेक उमेदवारांनी प्रत्येक मतदारांशी चार ते पाच वेळा संपर्क साधून विजयी करण्याच्या आवाहन केले आहे नेते मंडळीच्या सभा सुरू आहेत. प्रचारासाठी विविध भागात रिक्षा फिरत आहेत मोठमोठ्या सर्वांचे नियोजन सुरू झाले आहे अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूच्या काही उमेदवारांनी मतदारांना प्रलोभने दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेक हॉटेल, ढाबे यामध्ये मोठ्या प्रमाणात जेवणावळी सुरू झालेल्या आहेत. निवडणूक आयोगाने हॉटेल बंद करण्याची वेळ रात्री दहापर्यंत दिलेली असताना सुद्धा हॉटेल रात्री एक वाजेपर्यंत उघडे राहत आहेत. ज्या ठिकाणी फक्त जेवणाची सोय आहे त्या ठिकाणी सुद्धा अवैधपणे दारू विक्री केली जात आहे. काहींनी मतदारांना भेटवस्तू,किट याचे वाटप सुरू केले आहे. तर काहींनी साड्यापन मतदारांना दिले आहे. काही उमेदवाराने मतदारांना गोवा, कोकण, महाबळेश्वर, मुंबई,कोल्हापूर,शिर्डी तुळजापूर,आदमापूर, अक्कलकोट अशा सहलींवर नेण्यास सुरुवात केलेली आहे. यावर लाखो रुपयांचा खर्च होत असताना राज्य निवडणूक आयोगाने देखरेखीसाठी ठेवलेले स्थानिक प्रशासन व निवडणूक आयोग, पोलीस गप्प बसले आहेत. उघडपणे आचारसंहितेचा भंग होत असताना कसलीच कारवाई केली जात नाही. विविध कोपरा सभा, पदयात्रा यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.तोही खर्च कमी दाखवला जात आहे. अनेक हॉटेल, ढाब्यामध्ये दारू विक्री होत असताना उत्पादन शुल्क खाते गायबच आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने आळी मिळी गुपचिळीची भुमिका घेतली आहे.