फलटण{नसीर शिकलगार} – फलटण नगरपालिकेची सर्वात अधिक लक्षवेधी लढत प्रभाग क्रमांक 11 मध्ये तिरंगी होत आहे. पहिल्यांदा दुरंगी लढतीची अपेक्षा असताना सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांची अपक्ष उमेदवारी दाखल झाल्याने ही हाय व्होल्टेज लढत आता चांगलीच चुरशीची झाली आहे. अपक्ष उमेदवार कोणाची मते खाणार यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
प्रभाग क्रमांक 11 हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय तसेच उच्चवर्गीय लोक राहत असलेला सुशिक्षित असा मतदारसंघ आहे या मतदारसंघात रस्ते,आरोग्य,पिण्याचे पाणी या समस्या नागरिकांना सतावत आहेतच पण या समस्या सोडविण्यासाठी यावेळेस निवडणूक रिंगणात उतरलेल्या कोणत्या उमेदवारावर जनता विश्वास ठेवते हे लवकरच समजेल.
प्रभाग क्रमांक 11 अ हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. मतदारसंघातून भाजप तर्फे संदीप चोरमले, शिवसेनेतर्फे कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले हे प्रमुख उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. दोघांमध्ये लढत होईल असे वाटत असताना सामाजिक कार्यकर्ते व नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले पक्षाचे शहराध्यक्ष आमिरभाई शेख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तिन्ही उमेदवार सुशिक्षित आणि जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे आहेत तिघांनाही सामाजिक कार्याचा चांगला वारसा आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना सुद्धा मतदारांची कसोटी लागणार आहे अमीरभाई शेख यांनी यापूर्वी नगरपालिकेच्या तीन निवडणुका लढविल्या आहेत. सर्व निवडणुकांमध्ये त्यांना लक्षणीय मते मिळाली होती व अल्पमताने पराभव झाला होता मात्र पराभव होऊन सुद्धा खचून न जाता नव्या उमेदीने त्यांचे दिवस-रात्र सामाजिक कार्य सुरूच आहे. अडचणीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आधार देण्याचे आणि मदत करण्याचे काम अमीरभाई शेख हे करीत असतात. 24 तास जनतेसाठी झटणारा हा कार्यकर्ता आहे अशी ओळख त्यांची झाली आहे. या कार्याच्या बळावरच आपल्याला प्रभाग क्रमांक 11 मधून जनता निश्चितच विजयी करेल असा विश्वास ते वेळोवेळी व्यक्त करत असतात. संदीप चोरमले,दादासाहेब चोरमले व अमीरभाई शेख यांनी अनेक आंदोलनात एकत्रितरित्या भाग घेतलेला आहे. त्यांच्या बद्दल जनमत चांगले असताना तिघे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने अपक्ष आमिरभाई शेख हे किती मते कोणाची मिळवितात यावरून जय पराजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे. नागरिकांपुढे कोणाला विजयी करायचा हा पर्याय उपलब्ध आहे मात्र फलटणमध्ये सर्वाधिक चुरशीचा सामना प्रभाग क्रमांक 11अ मध्ये होणार आहे हे निश्चित.