फलटण{नसीर शिकलगार} – आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक याच आठवड्यात जाहीर होणार असून त्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणे पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यामध्येच रंगणारआहे.
फलटण पंचायत समितीवर गेल्या 30 वर्षापासून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाची सत्ता आहे. गेली तीन वर्ष प्रशासकीय राजवट असल्याने ग्रामीण भागातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. खेडोपाड्यातील रस्ते उखडले असून पाणी व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक होत असून या आठवड्यामध्येच याची प्रत्यक्ष घोषणा होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत. आयाराम गयाराम चे पक्षप्रवेश सुरू आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेसाठी 7 गट व 14 पंचायत समिती गण होते मात्र यावेळी 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गण असणार आहे. तीस वर्षाची राजेगटाची सत्ता नगरपालिकेप्रमाणेच उलथवून टाकण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजे गटातील अनेक जण प्रवेश करत आहेत यापूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी राजेंगट सोडून भाजप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता तशीच परिस्थिती पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. नेते मंडळी जरी पक्ष प्रवेश करीत असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण पंचायत समितीमध्ये पुन्हा सत्ता मिळवू शकतो असा ठाम विश्वास राजेंगट व्यक्त करत आहेत. राजें गटाने नगरपालिका निवडणूक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच लढविली होती. अत्यंत चुरशीची ही निवडणूक झाली होती. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेर सिंह नाईक निंबाळकर हे ६०० मतांनी निवडून आले होते. भाजप व राष्ट्रवादीचे 18 व शिवसेना राजे गटाचे 9 नगरसेवक निवडून आले होते. राजे गटाने या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली होती त्याच पद्धतीने पंचायत समिती निवडणुकीला सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जोरावर पूर्ण ताकतीने निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.तर दुसरीकडे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत पंचायत समितीची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे गावोगावी फिरत असून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे ते काम करत आहेत.मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे इच्छुकांचा भरणा असून कोणाला तिकीट द्यावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे.
आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यातच पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार आहे. या निवडणुकीत सुद्धा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पदाला लागणार आहे. दोन्ही नाईक निंबाळकर यांच्या सत्ता संघर्षात जनता कोणाच्या पाठीशी राहणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्यातरी निवडणूक लागणार असल्याने कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. अनेक जण इच्छुक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावे म्हणून नेते मंडळीच्या गाठीभेटी घेत आहेत