फलटण – वसंतराव साधुराव कणसे उर्फ बापू यांचा जन्म दि. ९ डिसेंबर १९४३ रोजी गुणवरे, ता. फलटण येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. बापूंचे प्रा. शिक्षण गुणवरे येथे, माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल, फलटण आणि उर्वरित शिक्षण पुणे येथे झाले. पुण्यात शिक्षण घेतानाच बापूंचा अनेक चळवळींशी संबंध आला. त्यातून त्यांना समाजकारणाची आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर गुणवरे येथे आलेल्या बापूंनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारण व समाजकारणाला सुरुवात केली. ग्रामस्थांना विविध नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी त्यांचा विशेष कटाक्ष असे.
स्व. बापूच्या कार्यकर्तृत्वाने गुणवरे गाव विविध सामाजिक चळवळींचे केंद्रस्थान बनले. १९७८ मध्ये गावच्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमनपदावर आरूढ झालेल्या बापूंनी त्या क्षेत्रातही उत्तम काम करून संस्थेला नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यापूर्वी सन १९७० मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून गेलेल्या बापूंनी त्या माध्यमातूनही शेतक-यांसाठी उत्तम काम केले.
सन १९७८ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलेले बापू सलग ११ वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून तेथे कार्यरत होते. त्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील सर्व गावांना वीज, पाणी, शिक्षण, रस्ते, आरोग्य वगैरे नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना टेलिफोन ऑफिस या सुविधा त्यांनी आपल्या गावामध्ये आणल्या. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंतराव साधुराव कणसे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्याच्या पूर्व भागातील होतकरू तरुणांना नोकरी व उद्योग व्यवसायाची संधी त्यांनी मिळवून दिली. गावात प्रा. शाळा असल्या तरी गुणवरे व परिसरातील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गुणवरे येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. आज या संस्थेच्या माध्यमातून संजय गांधी विद्यालय, गुणवरे आणि मठाचीवाडी विद्यालय, मठाचीवाडी या दोन माध्यमिक विद्यालयांच्या माध्यमातून परिसरातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय उच्च अधिकारी पदावर कार्यरत असून त्याचे श्रेय स्व. बापूंनाच द्यावे लागेल. आज गुणवरे गावची ओळख अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते याचे सर्व श्रेय बापूंना जाते.
स्व. बापूंच्या शैक्षणिक विचाराचा वारसा समर्थपणे हातात घेवून अनंत अडचणीवर मात करीत बापूंचे चिरंजीव राहुल कणसे संस्थेच्या सचिवपदाची व अध्यक्षपदाची जबाबदारी रेश्मा ताई कणसे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अत्यंत निष्ठेने आणि निस्पृहपणे सांभाळीत आहेत. आपल्या संघटन कौशल्याद्वारे त्यांनी अल्पावधीत गुणवरे व मठाचीवाडी विद्यालये इमारतीसह सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज क्रीडांगण शाळेच्या क्रीडांगणावर विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याचा लाभ ग्रामीण खेळाडूंना मिळवून दिला आहे.
साधी विचारसरणी व अभ्यासूवृत्तीद्वारे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी व्यतीत केले अशा सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग ही विचारसरणी स्वीकारून तत्त्वनिष्ठा, काम करण्याची वृत्ती अंगीकारली होती 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त बापूंना आदरांजली वाहताना त्यांचे काम पुढे सुरू ठेवून प्रामुख्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हीच खरी श्रद्धांजली.
—- डी. डी. भोसले