फलटण – प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पत्रकार सन्मान सोहळा व वार्षिक क्रीडा संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले

समाजमन घडविणाऱ्या पत्रकारांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणारे वार्षिक क्रीडा संमेलन, असा दुहेरी उत्सव सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कोळकी येथे दि. १५ जानेवारी रोजी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्य क्रीडा दिनाच्या औचित्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे मन जिंकले.

संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड व प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांचा रोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब सातारा रिजनचे झोन चेअरमन लायन. जगदीश करवा, राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, एम.जे.एफ. ला. मंगेश दोशी, ला. सुहास निकम, ला. रणजित निंबाळकर, ला. उज्वला निंबाळकर, ला. सुनिता निकम, सौं स्वाती चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध माध्यमांतून समाजप्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचा पुस्तक व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, प्रसन्न रुद्रभट्टे, नासिर शिकलगार, सतीश कर्वे, युवराज पवार, संजय जामदार, पोपट मिंड, विकास शिंदे, किरण बोळे, अजय माळवे, वैभव गावडे, राजकुमार गोफणे, सागर चव्हाण, प्रशांत सोनवणे, अमोल पवार आदी पत्रकारांचा समावेश होता.
यावेळी बोलताना सौ. संध्या गायकवाड यांनी मकरसंक्रांती, भूगोल दिन, पत्रकार दिन व राज्य क्रीडा दिन यांचे महत्त्व स्पष्ट करत समाज घडविण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले.
तर राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देत, खेळामुळे शिस्त, संघभावना व जीवनमूल्यांचा विकास होतो, असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी मराठी पत्रकार दिन व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना खेळ व शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आदर्श ठेवून प्रगती साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक महेंद्र कातुरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.
यावेळी प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड, समन्वयिका अहिल्या कवितके, माधुरी माने, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
