स्थानिक
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण येथे यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ उत्साहात संपन्न.

फलटण – श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणने यशवंत राव चव्हाण हायस्कूल येथे आयोजित केलेला यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ उत्साहात पार पडला.

प्रथमतः श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके),संस्थेचे उपाध्यक्ष सी .एल.पवार , संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके) , सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), सदस्य हणमंतराव निकम ,ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या हस्ते प्रतिमा व सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या प्राचार्या सौ. एन. एम गायकवाड यांनी प्रास्ताविका मधून यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ आयोजित करण्या मागचा हेतू व उद्दिष्ट उपस्थितांना सांगितला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणने तयार केलेली २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व मेळाव्यातील सर्व उपस्थितांना दिनदर्शिका मोफत वाटण्यात आली.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण च्या वतीने या शैक्षणिक मेळाव्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था, करियर मार्गदर्शन केंद्रे, अकॅडमी, फूड स्टॉल यांच्या प्रतिनिधींचा यथोचित सत्कार सन्मानचिन्ह, दिनदर्शिका व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणने राबवलेला यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ अतिशय उपयुक्त व विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन करणारा ठरेल असे मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी अध्यक्षीय मनोगतातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आलेले असून आजचा ग्रामीण विद्यार्थी हा गोंधळलेल्या मनस्थितीत असून त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे या हेतूने फलटणमध्ये प्रथमच श्रीराम एज्युकेशन सोसायटी मार्फत यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ आयोजित केला आहे. हा यशवंत मेळावा नावाप्रमाणेच विद्यार्थ्यांना यशाच्या आकाशामध्ये भरारी घेण्यास निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल असा आम्हास विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शैक्षणिक मेळाव्याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या शैक्षणिक मेळाव्यास प्रतिसाद देऊन उपस्थित असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था, अकॅडमी, कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींचे त्यांनी कौतुक केले.

