स्थानिक

आम्ही माणूस आहोत, तर माणुसकीचे जग तयार करणे गरजेचे : इंद्रजीत देशमुख (काकाजी)

फलटण  : सरस्वती शिक्षण संस्था, संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कोळकी यांच्यावतीने अनंत मंगल कार्यालय, कोळकी (फलटण) येथे आयोजित ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पालकांचा उत्स्फूर्त आणि वाखाणण्याजोगा प्रतिसाद ही या कार्यक्रमाची विशेष जमेची बाजू ठरली.

    या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात वक्ते शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराडचे संस्थापक इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत पालकांना सखोल मार्गदर्शन केले. आम्ही माणूस आहोत, तर माणुसकीचे जग तयार करणे गरजेचे आहे, या प्रभावी शब्दांनी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

      आपल्या दीड तासाच्या प्रदीर्घ व्याख्यानात काकाजींनी पालकांचे विविध प्रकार, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू, समाजातील दूषित विचार प्रवाह, सोशल मीडियाचा मुलांवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर विवेचन केले. मुलांना सुरक्षित, आनंदी आणि समाधानकारक जीवन जगण्यासाठी पालकांनी कोणती भूमिका बजावावी, यावर त्यांनी ठोस मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जग वाईटाचे आहे म्हणून सत्याचा विजय होत नाही असे नाही. सत्य परेशान होता है मगर पराजित नाही होता ! पालकांनी मुलांना सत्य, नीतीमूल्ये आणि सकारात्मकतेवर विश्वास ठेवायला शिकवावे, असे सांगताना मुलांना त्यांच्या नैसर्गिक गुणांनुसार वाढू द्या, त्यांच्या आवडी-निवडी ओळखा, त्यांच्या क्षमतेचा सन्मान करा, असा संदेश देताना त्यांनी पालकांना आत्मपरीक्षण करण्याचेही आवाहन केले. 

    आपले मूल अद्वितीय आहे. त्याच्याशी संवाद साधा, त्याला जसे आहे तसे स्वीकारा, असे सांगत त्यांनी पालक-पाल्य नात्यातील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईल व टीव्हीच्या अति वापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पालकांना सावध केले. स्क्रीनवर मिळणाऱ्या आनंदापेक्षा मुलांना फिरायला, खेळायला घेऊन जा, त्यांच्या सानिध्यात राहा, त्यांना विश्वासात घ्या, असा व्यावहारिक सल्ला त्यांनी दिला.

      सलग दीड तास चाललेल्या या मार्गदर्शन सत्राने पालक अंतर्मुख झाले. अनेक मुद्दे त्यांच्या हृदयाला भिडले. विचार करायला भाग पाडणारे, सजगतेची जाणीव करुन देणारे आणि सकारात्मक पालकत्वाचा मार्ग दाखवणारे हे सत्र ठरले.

      कार्यक्रमा दरम्यान आदर्श माता – पिता जीवन गौरव पुरस्काराने पांडुरंग पवार व सौ. सुलोचना पवार यांना काकाजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आदर्श पालक पुरस्काराने सौ. प्रतिभा पोळ व किरण पोळ, सौ. रेश्मा गोसावी व संदीप गोसावी, सौ. शिल्पा राजे व अविनाश राजे, सौ. शीतल चव्हाण व प्रवीण चव्हाण, सौ. सुनीता शिंदे व निलेश शिंदे, सौ.अश्विनी शेंडे व अरुण शेंडे, सौ. सविता भुजबळ व महादेव भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. 

    यावेळी प्राचार्य रविंद्र येवले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्राचार्य अर्जुन रुपनवर, प्रा. रविंद्र कोकरे, सौ. प्रियंका पवार, मोहनराव डांगे, सुशांत निंबाळकर, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अहिल्या कवितके यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन श्रीमती आशादेवी भराडे यांनी केले. संस्थेच्या प्राचार्या सुजाता गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सुजाण पालकत्वाचा विचार रुजवणारी आणि पालकांना नवचैतन्य देणारी ही कार्यशाळा सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button