फलटण ते बारामती चौपदरीकरण कामात बारामती तालुक्यात पिकअप शेड तर फलटण तालुक्याला ठेंगा, सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची मात्र चुप्पी

फलटण{नसीर शिकलगार }- फलटण ते बारामती या रस्त्याचे चार पदरी चे काम सुरू असले तरी याचा दर्जा खालावलेला आहेच पण फलटण तालुक्यात संबंधित कॉन्ट्रॅक्टरने पूर्णपणे दुर्लक्ष करून सापत्नपनाची वागणूक दिलेली आहे. प्रवाशांसाठी बारामती तालुक्यात पिकअप शेड तर फलटण तालुक्याला ठेंगा दाखविला आहे.यावर कोणताच लोकप्रतिनिधी बोलत नाही.
आज फलटण – बारामती रोडची अवस्था पाहिली तर कामाचा दर्जा लगेच लक्षात येतो नवीन सिमेंट रोडलाच भेगा पडल्या असून खडबडीत रस्ता काही ठिकाणी झाला आहे.अनेक धोकादायक ठिकाणी सूचनाफलक नाही तसेच रिप्लेटर पण बसवलेले नाहीत. ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रामभरोसे आहे.
फलटण ते सांगवी आणि सांगवी ते फलटण रस्ता बघितला तर फलटण ते सांगवी रस्त्याचा दर्जा हलका वाटत आहे प्रवाशांना निवाऱ्यासाठी एकही पिकअप शेड उभारलेले नाहीत. उन्हाळ्यात प्रवासी एसटीची वाट बघत उन्हातच थांबत आहेत. तर बारामती तालुक्यात गावोगावी पिकअप शेड उभारले असून अनेक ठिकाणी सूचनाफलक लावलेले आहेत.तसेच ज्या त्या गावाजवळ गावांचे बोर्ड दिशादर्शक बसविलेले आहे. याच्या उलट फलटण तालुक्यातील परिस्थिती आहे एक ही गावाच्या नावाचा सूचनाफलक नाही. दिशादर्शक नाही तसेच आज कोणत्या बाजूला गावे आहेत याचीही माहिती नाही अशी अवस्था असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरच फलटणला सापत्नपनाची वागणूक देत आहे. काही भागात रस्त्यांची रुंदी कमी आहे त्यामागचे कारण समजू शकलेले नाही. या कामाचे इस्टिमेट किती आहे. काम कधी पूर्ण करायचे आहे. याचा फलक सुद्धा लावण्यात आलेला नाही या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात वाढत चालले असून संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. निकृष्ट कामाबाबत तसेच गैरसोयी बाबत कोणत्याच पक्षाचा लोकप्रतिनिधी काहीच बोलत नसल्याने ठेकेदाराचे फावत आहे.





