Uncategorized

८ जुलैला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर १७ जुलैला फलटण येथे मुक्काम

फलटण – आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. तसेच २४ जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. यंदा दुपारी तीन वाजता प्रस्थान होणार आहे. १७ दिवस मुक्काम, ४ गोल तर ३ उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ऍड.राजेंद्र उमाप यांनी दिली. आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे.

पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली.त्यामध्ये उमाप यांनी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला. ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात बुधवारी (८ जुलै) आळंदी येथून प्रस्थान, ९ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्काम, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कामी. पुढे १६ जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. १७ जुलै रोजी फलटण, तर १८ जुलै रोजी बरड येथे पालखी विसावणार आहे.
१९ जुलै रोजी नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी विसावणार आहे. २२ जुलै रोजी ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडीशेगाव मुक्कामी विसावणार आहे.
* २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे.
* २४ जुलैला आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालखी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहेत.
* २५ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button