फलटण – फलटण नगरपालिका निवडणूक अचानक २० दिवस पुढे गेल्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले तर दुसरीकडे काही मतदार आणि कार्यकर्ते खुश झाले आहे. निवडणूक पुढे गेल्याने शहरातील प्रभाग क्रमांक 2,3 4,7,8,9,11,12,13 यामध्ये आणखी चुरस वाढणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नव्याने व्ह्यू रचना करावी लागणार आहे.
फलटण नगरपालिकेचे निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 20 डिसेंबरला मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उमेदवार व त्यांच्या नेते मंडळींनी मोठा जोर लावलेला होता अनेक ठिकाणी जेवणावळी सुरू झाल्या होत्या तर पैसे वाटपाचे नियोजन सुरू झाले होते. उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद व पैसा निवडणुकीत लावला असताना प्रचार संपण्यास दोन दिवस बाकी असताना अचानक निवडणूक स्थगित करण्यात आल्याने अनेक उमेदवार हवालदिल झाले आहेत.बरेच उमेदवारांकडचा पैसा संपत आला होता तर काहींनी मतदारांची चांगली गोळाबेरीज केली होती ती पुन्हा करावी लागणार असल्याने अनेक उमेदवारांच्या डोळ्यात पाणी आले होते.
दुसरीकडे फलटण नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीने होत असताना निवडणूक पुढे गेल्याने याचा फायदा कोणाला होतोय हे आता नाजिकच्या काळात समजणार असले तरी ज्या प्रभागांमध्ये अत्यंत चुरस वाढली होती त्या प्रभागातील उमेदवारांना आता प्रचारासाठी आणखी वेळ मिळाल्याने त्यांना मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच आपली ताकद वाढवता येणार आहे.काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होत होत्या त्यामध्ये काहींचे पारडे जड तर काहींचे कमी होत होते अशा प्रभागामध्ये उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक, 2,3,4,7,8,9,11,12,13 मध्ये आणखी चुरस वाढली आहे. या प्रभागामध्ये काही वरचढ दिसत होते ते आता दिसतील का नाही यावर आता चर्चा सुरू झाली आहे. जे उमेदवार निवडणुकीत कमी पडत होते त्यांना आता नव्याने व्ह्यू रचना करून मुसंडी मारण्याची संधी आहे. एकंदरीत वीस दिवसाचा प्रचाराचा मिळालेला बोनस कोणाच्या पत्त्यावर पडतोय हे लवकरच समजेल. तर तिसरीकडे निवडणूक लांबल्याने काही कार्यकर्ते आणि मतदार खुश झाले आहेत काही कार्यकर्त्यांची आणखी काही दिवस चांगली सोय होणार असल्याने ते खुश आहेत.