स्थानिक

फलटणच्या निर्भीड, निस्वार्थी आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा वारसा निर्माण करणाऱ्या दिवंगत पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार दिनी वृक्षारोपण 

     

        फलटण  : फलटण शहर व तालुक्याला निर्भीड, निस्वार्थी आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा वारसा लाभला असून त्याच्या आधारे आजही फलटण तालुक्यातील पत्रकारिता शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची बांधिलकी स्वीकारुन कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देतानाच पूर्वीच्या पिढीतील सुमारे २०/२५ निर्भीड, निस्वार्थी पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार दिनाचे औचित्य साधून माळजाई उद्यानामध्ये या प्रत्येकाच्या नावाने एक/एक झाड लावून त्यांच्या स्मृती जागविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.

      फलटण लायन्स क्लब, माळजाई उद्यान विकास समिती आणि शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माळजाई उद्यानामध्ये लायन्स क्लब फलटण आणि माळजाई उद्यान विकास समिती पदाधिकारी, सदस्य, शहरवासीय नागरिक व पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तर बुधवार दि. ७ व गुरुवार दि. ८ रोजी माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान), फलटण येथे निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपणानंतर शहर व तालुक्यातील दिवंगत पत्रकारांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा आणि स्वातंत्र्योत्तरकाळात स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या तत्कालीन लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाला साथ करताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची बाजू ठामपणाने मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी या पत्रकारांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना उपस्थितांसमोर ठेवली. या कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार, लायन्स पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

          शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर, शाहू थोरात, बबनराव क्षीरसागर, दत्तोपंत देशपांडे, वसंतराव पेटकर, राजाभाऊ देशपांडे, वर्धमान शहा वगैरे जुन्या पिढीतील अनेक पत्रकारांनी त्यांच्या कार्यकाळात विविध सामाजिक प्रश्नांची बांधिलकी स्वीकारुन केलेले लिखाण निश्चितपणे समाजाला पाठबळ देणारे ठरल्याचे अनेक उदाहरणासह यावेळी अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.

        फलटण शहर व तालुक्यातील जुन्या पिढीतील पत्रकारांप्रमाणेच आजच्या पिढीनेही सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाठिंबा देण्याबरोबरच या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी ठोस भूमिका घेऊन शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या प्रश्नांचे गांभीर्य आणि ते सोडविण्याची आवश्यकता पटवून देण्यातही सतत पुढाकार घेतल्याचे अरविंद मेहता यांनी सांगितले.

         फलटण लायन्स क्लबने गेल्या ५८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत केलेल्या सेवाकार्याचा आढावा घेताना प्रारंभीच्या काळात अंधत्व निवारणाची मोहीम अत्यंत प्रभावी रीतीने राबविताना पद्मभूषण डॉ. एम. सी. मोदी यांनी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करताना एका शिबीरात २०० व त्याहून अधिक शस्त्रक्रिया केल्या त्यावेळी रुग्ण व त्याचे सोबत असलेले नातेवाईक यांचा ५ दिवस निवास भोजन व्यवस्थेसह औषधोपचाराचा खर्च फलटण लायन्स क्लबने केल्याचे निदर्शनास आणून देतानाच अलीकडे या क्षेत्रात आलेल्या अत्याधुनिक साधने सुविधांनी सुसज्ज, लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालय माध्यमातून अत्यंत उत्तम पद्धतीची नेत्र चिकित्सा व नेत्र शस्त्रक्रियेची सुविधा अल्प मोबदल्यात, गरजूंना मोफत उपलब्ध करुन दिल्याचे निदर्शनास आणून देताना या कामाचे मूल्यमापन करुन आंतरराष्ट्रीय लायन संघटनेने या नेत्र रुग्णालयाला सुमारे एक कोटी २५ लाख रुपयांची अत्याधुनिक मशिनरी देणगी स्वरुपात दिल्याचे निदर्शनास आणून देत अरविंद मेहता यांनी फलटण लायन्स क्लबच्या सेवाकार्याचा आढावा घेतला.

   माळजाई उद्यान विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उद्यानाचे रुपडे टप्प्याटप्प्याने पालटविण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात उद्यानात असलेल्या माळजाई देवी मंदिराची डागडुजी, रंगरंगोटी, सुशोभीकरण, सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही, कुंपण भिंतीची दुरुस्ती, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून वृद्धांसाठी व्यायामाची साधने (जिम), नाना नानी पार्क, वॉकिंग ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अरविंद मेहता यांनी सांगितले. 

    प्रारंभी माळजाई उद्यान विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात माळजाई उद्यानातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. माजी लायन्स प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांनी फलटण लायन्स क्लब व पत्रकार हातात हात घालून फलटणच्या विविध प्रश्नांची सोडवणूक आणि सर्वसामान्यांच्या सेवाकार्यात कटिबद्ध असल्याचे नमूद करीत त्यासंबंधीच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. पत्रकार सुभाष भांबुरे यांनी दिवंगत पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण व संवर्धन योजनेविषयी माहिती दिली.

      माजी आमदार कॉ. हरिभाऊ विठ्ठलराव निंबाळकर (दै.    

शिवसंदेश), माजी खासदार हिंदुराव निळकंठराव नाईक निंबाळकर (दै. शिवसंदेश, सा. ठिणगी), अनंत शंकर उर्फ बबनराव क्षीरसागर (दै. केसरी), वसंतराव भालचंद्र पेटकर (सा. जनसेवा), वर्धमान वालचंद शहा (सा. आदेश), दत्तोपंत भगवंत देशपांडे (दै. तरुण भारत, दै. ऐक्य), शाहू नागेश थोरात (ब्लीट्ज), राजाराम विनायक देशपांडे (दै. सकाळ), वसंतराव दत्तात्रय ढवळीकर (दै. प्रभात), दिगंबर विनायक देशपांडे (दै. महाराष्ट्र हेरॉल्ड), सुभाषराव बाजीराव निंबाळकर (सा. सुभाषित), व्यंकटेश नारायण देशपांडे तथा बापू देशपांडे (दै. सकाळ), सुधीर मनोहर उंडे (दै. पुढारी), दिलीपराव मधुकर रुद्रभटे (दै.स्थैर्य), प्रा. रमेश तुकाराम आढाव (दै. तरुण भारत), दिलीप सिताराम देशपांडे (सा. योद्धा), विलास राजाराम साळुंखे (दै. शिवसंदेश), सुरेश कोंडीबा गायकवाड (सा. छत्रपती),आर. के. निंबाळकर (दै. सकाळ), राजेंद्र दिनकर भागवत (दै. ऐक्य), भालचंद्र रामचंद्र देशपांडे (दै. प्रभात), ॲड. दस्तगीर मेटकरी (सा.अंकुश व पोलीस पाटील), रामविलास बळवंत रणसिंग (सा. शिखर शिंगणापूर), चंद्रकांत नारायण साळवी (सा. समांतर रिपब्लिकन) या फलटण शहर व तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले.  

        आर्किटेक्ट स्विकार मेहता यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button