फलटण –उत्सवाचा आनंद देणारा पतंगोत्सव आता फलटण शहर व तालुक्यासाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. बंदी असलेला घातक चायनीज मांजा बाजारात आणि आकाशात सर्रास फिरत असून, दररोज निष्पाप नागरिक, चिमुकले आणि प्राणी-पक्षी गंभीर जखमी होत आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यात दररोज रक्ताचे सडे पडत असताना, पोलीस, नगरपालिका आणि महसूल विभाग मात्र निष्क्रीय बनून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मग्न आहेत.

रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या गळ्याला थेट फास लावणारा हा चायनीज मांजा म्हणजे उघड्या डोळ्यांनी सुरू असलेला खूनी खेळच आहे. दररोज उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या जखमींची संख्या वाढतेय, पण शासकीय खाती मात्र अजूनही ‘कागदी घोडे’ नाचवण्यात व्यस्त आहेत.
पोलीस म्हणतात: छापे मारण्याचे काम नगरपालिकेचे आणि महसूलचे!महसूल विभाग गप्प.सर्वकाही उघड्या डोळ्यांनी पाहूनही मूग गिळून गप्प!या एकमेकांवर ढकललेल्या जबाबदारीचा थेट फायदा मात्र काळाबाजार करणाऱ्या आणि अनधिकृत विक्री करणाऱ्या नराधम विक्रेत्यांना होत आहे.
या जीवघेण्या धाग्यामुळे केवळ मानवी जीव धोक्यात आला नसून, आकाशात उडणारे शेकडो निष्पाप पक्षी पंख छाटून तडफडून मरत आहेत. रस्त्यावरील जनावरांच्या पायात हा प्लास्टिक मांजा अडकून त्यांचे अवयव निकामी होत आहेत.
शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन मोहीम उघडली तर २४ तासांत चायनीज मांजाचा सुळसुळाट बंद होऊ शकतो. त्यासाठी खालील कठोर पावले उचलणे गरजेचे आहे:पोलीस , नगरपालिका आणि महसूल विभागाने संयुक्त पथके बनवून प्रत्येक दुकानाची आणि छुप्या गोदामांची झाडाझडती घ्यावी.
चायनीज मांजा विकणाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा (Section 307/Non-bailable) गुन्हा दाखल करून त्यांची दुकाने सील करावीत.लहान मुलांना हा मांजा घेऊन देणाऱ्या पालकांचे प्रबोधन करून, गरज पडल्यास कडक इशारा द्यावा.
“एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? की वेळीच एकत्र येऊन या विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक करून त्यांची कायमची अद्दल घडवली जाणार?”फलटणकरांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आता ‘गंभीर’ नव्हे तर ‘आक्रमक’ होण्याची गरज आहे!
Back to top button
