फलटण, : महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव आणि फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशालीताई कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले सन २०२० – २१ च्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराने पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र दिनानिमित्त सातारा येथील शाहू स्टेडियमवर झालेल्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते सौ वैशालीताई चोरमले यांचा या पुरस्काराने येथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक पिंगळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
ठाकूरकी, ता. फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधीर विद्यालयाच्या माध्यमातून सौ. चोरमले यांनी केलेले उल्लेखनीय कार्य आणि नगरसेविका म्हणून शहरातील महिलांसह शहरवासीयांसाठी केलेल्या कामाची नोंद घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हा पुरस्कार जाहीर केला होता, त्याचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले.
मूकबधीर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत लघुउद्योग, क्रीडा, संगीत व कला क्षेत्राचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविले, त्यासाठी स्वतःच्या निधीतून विद्यालयाची दुमजली सुसज्ज इमारत, क्रीडांगण, वसतीगृह, स्कूल बस व सर्व शैक्षणिक सुविधा, साहित्य या विद्यालयात उपलब्ध करुन दिले. विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन केले, आणि विद्यालयातील ही मूकबधीर मुले या स्पर्धांमध्ये यशस्वी झाली.
मूकबधीर मुले कुटुंबाचा आधार बनावीत व स्वतःच्या पायावर उभी रहावीत यासाठी चोरमले दाम्पत्य गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. शासकीय अनुदानाशिवाय वसतीगृह चालवणे, शिक्षकांना प्रशिक्षित करणे यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे.
नगरसेविका म्हणून फलटण शहरातील आणि विशेषतः महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेतली.
पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी सौ. वैशालीताईंचे अभिनंदन केले आहे.
फोटो : सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार स्वीकारताना सौ. वैशालीताई चोरमले, शेजारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख पिंगळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन.