स्थानिक

भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानिमित्त कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून सत्कार

फलटण – भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानिमित्त कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला 

नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात ७-० असा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी कर्णधार म्हणून यशस्वीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दक्षिण आशियातील सर्वोच्च मानाचा किताब आपल्या नावावर केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाच्या वतीने समूहाचे संचालक तसेच युवाउद्योजक  सचिन यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना सचिन यादव यांनी सांगितले की, “खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून तो शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. लखन मोरे यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले आहे. त्यांचा हा प्रवास युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”

के. बी. उद्योग समूह आणि विशेषतः सचिन यादव हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असतात. शिक्षण, सामाजिक कार्य, कला, संस्कृती तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींना प्रोत्साहन व मदत करण्यासाठी के. बी. उद्योग समूह सातत्याने पुढाकार घेत असतो. विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना आर्थिक व नैतिक पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याचे कार्यही समूहामार्फत केले जाते.

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राचेही नाव उज्ज्वल झाले असून लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी उपस्थितांनी भारतीय संघाचे आणि कर्णधार लखन मोरे यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच प्रकारे देशासाठी यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सॉफ्ट हॉकी हा पूर्णपणे भारतात विकसित झालेला खेळ असून त्याचा प्रसार आणि लोकप्रियता दक्षिण आशियाई देशांमध्ये वेगाने वाढत आहे. भारताने या पहिल्याच स्पर्धेत विजेतेपद मिळवून या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.यावेळी के. बी. च्या संचालिका सौं सुजाताताई यादव, नंदकुमार मोरे कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button