फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण पुन्हा सुरु करण्यासाठी भागाचे (शेअर्सचे) नक्तमूल्य उणे असल्याने बँका अर्थसहाय्य करीत नाहीत, शासनाकडे थक हमीची मागणी केल्यानंतर त्यांनी राजकीय हेतूने नकार दिल्याने श्रीरामचे भवितव्य अंध:कारमय झाले असताना, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी साथ केल्यानेच श्रीराम यावर्षीचा हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून तालुक्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर, कामगारांना नियमाप्रमाणे वेतन भत्ते देण्यात यशस्वी होईल असा विश्वास आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत आणि विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करीत संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीरामचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, श्रीराम बझारचे चेअरमन जितेंद्र पवार, बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, सौ. वैशाली कांबळे, उपसभापती अमोल सस्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम आणि साखरवाडी कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न सफल होत नाही, कारण ते त्यांच्या हातात नाही, कारखान्याचे मालक असलेले सभासद आणि तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरीच श्रीरामला तारु किंवा मारु शकतात हे या शेतकऱ्यांनी कृतीने दाखवून दिले असल्याचे निदर्शनास आणून देत त्याबद्दल श्रीरामचे सभासद आणि नव्याने ऊस उत्पादक म्हणून पुढे आलेल्या शेतकऱ्यांनी अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्याची आणि जे सभासद नाहीत मात्र त्यांचा ऊस श्रीरामकडे गाळपास येतो अशा शेतकऱ्यांनी आपल्या आवाहनाला साथ केल्यानेच मोठ्या प्रमाणावर भाग भांडवल जमा होऊन श्रीरामच्या भागाची किंमत वाढली उणे नक्तमूल्य आता अधिक झाल्याने श्रीराम त्या दृष्टीने सक्षम झाला असल्यानेच आता बँकेचे कर्ज उभारुन श्रीरामच्या यावर्षीच्या हंगामाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे, तथापि जुन्या सभासदांपैकी ज्यांचे शेअर्स अपूर्ण होते, त्यापैकी केवळ २५ % सभासदांनी शेअर्सची अपूर्ण रक्कम पूर्ण केली आहे, उर्वरित सभासदांनी ती पूर्ण करण्याची नितांत आवश्यकता आहे, तरच पुढच्या पिढीसाठी हा कारखाना अखंडित सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच तालुक्यात आलेल्या कृष्णेच्या पाण्यातून कायम दुष्काळी पट्ट्यात आणि बागायती पट्ट्यातही ऊसाचे क्षेत्र वाढत आहे, मात्र ही मंडळी श्रीरामची सभासद नव्हती, त्यांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेअर्सची पूर्ण रक्कम जमा करुन श्रीरामचे सभासदत्व स्वीकारल्याने, श्रीरामचे भाग भांडवल वाढून नक्तमूल्य सुधारले आहे, तथापि ही वाढ पुरेशी नसल्याने आगामी काळात जुन्या सभासदांनी शेअर्सची रक्कम पूर्ण करावी आणि नव्याने ऊस उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांनीही श्रीरामचे सभासद व्हावे त्यातून श्रीराम स्वतःच्या आर्थिक क्षमतेने भविष्यात गाळप क्षमता वाढ आणि अन्य उपपदार्थ निर्मितीतून या तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून पुढच्या पिढीला सक्षमपणे साथ करील याची ग्वाही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्य सरकार श्रीरामच्या किंवा आपल्या विरोधात अजिबात नाही, किंबहुना मुख्यमंत्र्यांशी आपले मैत्रीचे संबंध आहेत, तथापि त्यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल करण्यात आल्यानेच पूर्वीची मोठी थकीत कर्जे असलेल्या राज्यातील अन्य कारखान्यांना थक हमी देण्यात आली, मात्र निष्कर्षी असलेल्या श्रीरामला थक हमी देण्यास नकार देण्यात आला, ही बाब दुर्दैवी आहे, तथापि नेमकी परिस्थिती जाणून घेतल्यानेच तालुक्यातील सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला साथ केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतानाच ही साथ अखंडित ठेवा त्यातच तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल ठरविण्याची ताकद असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
साखर धंद्यातील अनिश्चितता आणि साखर उत्पादनातील वाढत्या खर्चाने, पूर्वकल्पना देवूनच जवाहरने कराराप्रमाणे यापुढे श्रीराम कारखाना चालविणे अशक्य असल्याची स्पष्ट कल्पना दिली, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या मान्यतेने श्रीरामच्या संचालक मंडळाने विशेष साधारण सभा घेऊन शासन आणि सभासदांना या बाबीची पूर्ण कल्पना देवून भागीदारी तत्त्वावर श्रीराम अन्य संस्थेला चालविण्यास देण्यासाठी प्रयत्न केले, त्यातून साखर धंद्यातील दोन खाजगी संस्थांनी पुढे येऊन निविदा भरली त्याप्रमाणे अधिक लाभदायक असलेली श्री दत्त इंडियाची निविदा स्वीकारुन त्यांना श्रीराम चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र त्याला विरोध झाल्यानंतर न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने शासनाला त्याबाबत ६ आठवड्यात मत देण्यासाठी सुचित केले, तथापि तोपर्यंत थांबल्यास यावर्षीचा गळीत हंगाम सुरु करणे शक्य होणार नसल्याने आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभासद व ऊस उत्पादकांना आवाहन करुन श्रीराम या गर्तेतून बाहेर काढून स्वतःच्या माध्यमातून चालविण्याचे आवाहन केल्यानंतर श्रीरामच्या भागाचे कमी असलेले नक्तमूल्य वाढल्याने आज परिस्थिती बदलली असल्याचे निदर्शनास आणून देत त्याचे संपूर्ण श्रेय आ. श्रीमंत रामराजे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच द्यावे लागेल असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी पत्राद्वारे कारखाना कामकाजासंबंधी काही गोष्टींची विचारणा केली असून त्याबाबत त्यांना लेखी कळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच, या पत्रात त्यांनी विशेष साधारण सभा बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे, तथापि उच्च न्यायालयाच्या मान्यतेने आणि सुमारे ९८ ते ९९ % सभासदांच्या सहमतीने सदरच्या सभेचे कामकाज झाले मग ती बेकायदेशीर कशी असा सवाल श्रीमंत संजीवराजे यांनी उपस्थित केला.
श्रीरामचा ताळेबंद जाहीर होतो, मात्र श्रीराम – जवाहरचा ताळेबंद जाहीर केला जात नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. वास्तविक सर्वसाधारण सभा श्रीरामची असल्याने त्यामध्ये श्रीरामचा ताळेबंद जाहीर होतो, या सभेत श्रीराम – जवाहरचा ताळेबंद जाहीर करण्याचे कारण नाही तथापि कोणाला सदर ताळेबंद पहायचा असेल तर तो कारखान्याच्या कार्यालयात उपलब्ध आहे, तो कोणालाही पाहता येईल याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे यांनी दिली.
जवाहरने मुदतीपूर्वी करार भंग केल्याने नुकसान भरपाई पोटी ८ कोटी रुपये श्रीरामला देण्याचे मान्य केले आहे, तथापि जवाहरने श्रीरामची गाळप क्षमता वाढ व अन्यकारणाने केलेली गुंतवणूक परतफेड करावी लागणार आहे, त्याची आकडेवारी दोन्ही संस्थांचे अकाउंटंट एकत्र बसून करतील त्यानंतर सदरचे देणे – घेणे निश्चित होईल, तथापि करारातील तरतुदीप्रमाणे श्रीराम जवाहरला काही देणे लागत असला तरी सदरची रक्कम सन २०२९ ते २०३६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने परत करावयाची असून त्यावर कोणतेही व्याज श्रीरामला द्यावे लागणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
श्रीराम पूर्ववत सुरु करण्यासाठी आ. श्रीमंत रामराजे यांच्या अभिनंदनचा ठराव या सभेत करण्यात आला त्याबद्दल सभासदांना धन्यवाद देतानाच श्रीमंत रामराजे यांच्याप्रमाणेच जवाहर कारखान्याचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे तथा दादा, आ. प्रकाश आवाडे, जवाहर चे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, यांच्यासह जवाहरचे संचालक, सभासद यांनाही धन्यवाद दिले पाहिजे, त्यांनी खऱ्या अर्थाने २० वर्षे साथ केल्यानेच श्रीरामला स्थैर्य प्राप्त झाल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी आवर्जून सांगितले. कल्लाप्पाण्णा आवाडे यांना नुकतेच जीवन गौरव पुरस्काराने दिल्लीत सन्मानित करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले.
स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी फलटण येथे पत्रकार परिषद घेऊन श्रीरामच्या सद्यस्थितीचा आणि त्याचबरोबर राज्यातील साखर उद्योगाचा सविस्तर आढावा घेत श्रीरामची बाजू पत्रकार परिषदेत मांडल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांनी राजू शेट्टी यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून तालुक्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत त्याचा तपशील विस्ताराने सभेसमोर ठेवला. श्रीराम बंद पडावा यासाठी करण्यात आलेली व्युह रचना न्यायालयाच्या माध्यमातून रद्दबातल ठरविण्यात यश आले असले तरी श्रीरामचे भाग (शेअर्स) नक्तमूल्य उणे असल्याने कारखाना चालविण्यासाठी निधीची तरतूद करणे कठीण होते, तथापि आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बैठका घेऊन सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडून नक्तमूल्य वाढविण्यासाठी केलेल्या आवाहनाला सभासद व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५ हजार ९३३ अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यात आले, १ हजार ६५ मयत सभासदांचे वारस नियुक्त करुन त्यांचे शेअर्स पूर्ण करुन घेण्यात आले, १ हजार ७०६ नवीन सभासदांनी पूर्ण रक्कम भरुन सभासदत्व स्वीकारले त्यातून आज श्रीरामची सभासद संख्या १८ हजारावर पोहोचली असून एकूण भाग भांडवल ६ कोटी ४६ लाख ८ हजार २६० रुपये झाले आहे, ब वर्ग सभासदांची संख्या व त्यांचे भाग भांडवल वेगळे असल्याचे निदर्शनास आणून देत आगामी काळात २१ हजार सभासद करुन श्रीराम सर्वार्थाने सक्षम करण्याची ग्वाही डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी अध्यक्षीय भाषणात दिली.
गतवर्षीच्या हंगामात प्रति टन ३३०० देण्याचे जवाहरने जाहीर केले होते, त्यापैकी ३२०० रुपये एक रकमी यापूर्वीच ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून उर्वरित १०० रुपये आगामी दिवाळी सणापूर्वी बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत, त्याचप्रमाणे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रति टन एक किलो साखर टेंडर दराच्या ५० % किमतीत उपलब्ध करुन देण्याची घोषणा यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी अन्य कारखाने प्रति टन आणखी २०० रुपये दिवाळी सणापूर्वी देणार असल्याने श्रीरामनेही प्रति टन २०० रुपये द्यावेत अशी आग्रही मागणी केली.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीरामच्या बाबतीत घेतलेली ठाम भूमिका, तसेच कायम दुष्काळी भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविताना केलेले प्रयत्न विचारात घेता आजच्या सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी मांडला त्याला धनंजय पवार यांनी अनुमोदन दिल्यानंतर सभेने तो ठराव टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर केला.
हनुमंत शिंदे यांनी शिंदेवाडी व खुंटे ही गावे श्रीरामच्या फलटण – विडणी गटात असल्याने येथील ऊस उत्पादकांना वेळेत तोडी मिळण्यात अडचणी येत असल्याचे आपण गेल्या दोन वर्षापासून निदर्शनास आणून देत असून सदरची दोन्ही गावे साखरवाडी – जिंती गटात समाविष्ट करण्याची आणि येथील ऊसाच्या तोडीसाठी प्राधान्याने अधिक वाहने देण्याची मागणी केली कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी त्याबाबत सुधारणा करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. शिवाजीराव लंगुटे, हनुमंतराव चव्हाण वगैरेंची समयोचित भाषणे झाली.
संचालक संतोष खटके यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, गायिका आशा भोसले श्रीराम चे माजी संचालक मोहनराव नाईक निंबाळकर बाजार समितीचे माजी चेअरमन डॉ. विजयराव बोरावके व पोपटराव काकडे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कारखान्याचे सभासद यांचे निधनाबद्दल दुःखवट्याचा ठराव मांडला त्याला उपस्थितांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी शेवटी आभार मानले.

Back to top button
