स्थानिक

हिंजवडीतील कोंडीच्या ‘व्हायरस’ला परिणामकारक आळा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांचा अभिनव उपक्रम; शेकडो व्हिडिओंद्वारे जनजागृती 

पुणे :–पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचलेले मार्ग तसेच पर्यायी रस्त्यांची माहिती नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे.

सोनवणे यांनी घटनास्थळांवरून प्रत्यक्ष व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲप ग्रुप, समाजमाध्यमे आणि नागरिकांच्या नेटवर्कद्वारे प्रसारित केले. त्यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि नागरिकांना रस्त्यांची खरी परिस्थिती समजून प्रवासाचे नियोजन करता आले.

दरवर्षी पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. पाण्याखाली गेलेले मार्ग, वाहणारे पाणी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत वाहतूक विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांची माहिती मिळाली आणि अनावश्यक कोंडी तसेच अपघातांचा धोका कमी झाला.

सोनवणे यांनी केवळ वाहतूक नियोजनावर भर न देता नागरिकांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी, पाणी साचलेल्या रस्त्यांवर वाहन चालवताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही व्हिडिओंद्वारे सातत्याने मार्गदर्शन केले.

“लाखो जणांचा भार आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर असतो. वाहतूक कोंडीची माहिती वेळेवर नागरिकांपर्यंत पोहोचल्यास त्यांना मोठा दिलासा मिळतो. समाजमाध्यमांचा उपयोग करून नागरिकांचा मनस्ताप कमी करणे हाच या उपक्रमामागील उद्देश आहे.”

— राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग

हिंजवडी परिसरातील नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी हा उपक्रम आदर्श ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button