स्थानिक
फलटणकरांचा प्रवास होणार हायटेक; परिवहन मंत्र्यांकडून २५ नवीन बसेस आणि आधुनिक बसस्थानकाची घोषणा!, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीला यश

फलटण:- फलटणकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटण एसटी आगाराला धावती भेट देऊन येथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी फलटणकरांच्या सोयीसाठी आणि आगाराच्या कायापालटासाठी कोट्यवधींच्या विकासकामांची घोषणा केली आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत, ते आधुनिक करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांनी फलटण बसस्थानकाचा ‘पीपीपी’ (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेलवर संपूर्ण पुनर्विकास करण्याची घोषणा केली.
नव्या बसस्थानकात प्रशस्त व वातानुकूलित प्रतीक्षालय, आधुनिक स्वच्छतागृहे आणि डिजिटल माहिती प्रणाली (LED डिस्प्ले) बसवली जाईल.प्रवाशांच्या सोयीसाठी आणि एसटीच्या उत्पन्नासाठी भव्य व्यापारी गाळे (शाॅपिंग कॉम्प्लेक्स) आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.
यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार केवळ स्थानकच नाही, तर प्रवाशांचा प्रवासही सुकर करण्यासाठी फलटण आगाराला एकूण २५ नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. हा पुरवठा दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १५ नवीन बसेस तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील.दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १० बसेस आगाराच्या सेवेत दाखल होतील.
फलटण एसटी आगाराच्या आवारात अनेक वर्षापासून पडून असणाऱ्या परिवहन विभागाने ठेवलेल्या {आरटीओच्या} भंगार गाड्यांकडे मोर्चा मंत्री प्रताप सरनाईक यांनी 20 तारखेच्या आत या गाड्या उचलून घेऊन जाव्यात एसटी आगाराला स्वच्छता करताना अडचणी येत आहेत तसेच भंगार गाड्या उचलून नेल्याने एसटी आगाराला मोकळी जागा सुद्धा उपलब्ध होणार आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
परिवहन मंत्र्यांच्या या धडाकेबाज घोषणांमुळे फलटण आगाराचा चेहरामोहरा बदलणार असून, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळणार हे आता निश्चित झाले आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी अचानक भेट दिल्याने स्थानकामध्ये मोठी स्वच्छता करण्यात आली होती. कधी नव्हे ते स्वच्छतागृह सुद्धा टापटीप ठेवण्यात आले होते. या स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त करतानाच आगाराच्या प्रगतीसाठी त्यांनी घोषणा केल्याने एसटी आगाराच्या इमारतीला आणि आगाराच्या उत्पन्नाला बळकटी मिळणार आहे.
यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, नगरसेवक विशाल तेली आदी उपस्थित होते.



