स्थानिक

फलटणमध्ये माणुसकीला काळीमा! खाजगी अकॅडमीत पाचवीच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून काठी आणि पट्ट्याने बेदम मारहाण झाल्याचे समजते ; पोलिसांत तक्रार करू नये म्हणून दबाव अन् खवडीचा प्रयत्न ??

भाग – १

फलटण : – फलटण शहरालगत असणाऱ्या एका खाजगी अकॅडमीमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांनी काठी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समजते ? . या अमानुष मारहाणीत बालकाच्या पाठीवर गंभीर वळ उठले असून, या घटनेने संपूर्ण फलटण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अद्याप याबाबत पोलिसात गुन्हा नोंद झाला नसल्याचे समजते 

पीडित बालक गरीब कुटुंबातील असून, त्याचे हवालदिल झालेले पालक फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, पोलिसांत तक्रार नोंदवू नये यासाठी अकॅडमी चालकाकडून पालकांवर मोठा दबाव आणला जात आहे.

गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी उलट पीडित मुलावरच ‘खवडी’ (खोटा आळ) घालण्याचा कुटिल प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. एवढेच नव्हे तर, आज संबंधित अकॅडमी चालकाने त्या बालकाला जबरदस्तीने अकॅडमीत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फलटणमध्ये खाजगी अकॅडमींचे पेव; नियम धाब्यावर!

फलटण शहर आणि लगतच्या परिसरात खाजगी अकॅडमींचे मोठे पेव फुटले आहे. अनेक अकॅडमी चालकांनी सर्व शासकीय नियम व अटी पायदळी तुडवल्या आहेत. काहीजण एकाच छोट्या खोलीत अनेक विद्यार्थ्यांना दाटीवाटीने कोंबून दिवसभर शिकवित बसवले जाते. त्यांना कोणत्याही सोयी सुविधा भेटत नाही.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

 फलटणमधील अनेक अकॅडमी चालकांवर आधीच विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही अशा बेकायदेशीर अकॅडमींना परवानग्या मिळतातच कशी, हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.

 काही दिवसांपूर्वीच एका नामांकित अकॅडमीत विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला होता. ती घटना ताजी असतानाच ही नवी अमानुष घटना घडल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मासूम बालकावर झालेल्या या अमानुष अत्याचाराविरोधात फलटणकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित मुजोर शिक्षक आणि दबाव आणणाऱ्या अकॅडमी चालकावर तत्काळ बाल हक्क संरक्षण कायद्यांतर्गत कडक पोलीस कारवाई करावी आणि बेकायदेशीर चालणाऱ्या अकॅडमींवर टाळा ठोकावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button