फलटण : सांगवी (ता. फलटण) येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, फलटण तालुक्यात अनेक दशकांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि सामाजिक सलोख्याची मोठी परंपरा आहे. दुर्गा दौड च्या दरम्यान एका महिलेने जमावावर हल्ला केला होता. या घटनेमुळे हिंदू बांधवांच्या भावनाही दुखावल्या असून, मुस्लिम समाज त्यांच्या भावनांचा आदर करत पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. तालुक्यात कायमस्वरूपी हिंदू-मुस्लिम ऐक्य टिकून राहावे यासाठी मुस्लिम समाज कटिबद्ध असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर आणि कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी फलटण तालुका मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.