स्थानिक

फलटण नगरपरिषदेत ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्त ‘एकल महिला दिवस’ साजरा; विविध शासकीय योजनांची दिली माहिती

फलटण:संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेल्या २३ जून या ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’चे औचित्य साधून फलटण नगरपरिषदेच्या कार्यालयात ‘एकल महिला दिवस’ कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला होता. “विधवा” या शब्दाऐवजी “एकल महिला” या सन्मानजनक संज्ञेचा वापर करून शहरातील एकल महिलांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांचे स्वागत करून, महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

​याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे, मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सभापती सौ. सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेविका सौ. मीना जीवन काकडे आणि महिला बालकल्याण समिती सदस्या सौ. स्वाती राजेंद्र भोसले प्रामुख्याने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात उपस्थित महिलांना प्रामुख्याने शासकीय स्तरावरील कामकाजाची माहिती देण्यात आली. यामध्ये रोजगार, स्वयंरोजगार, उपजीविका तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगार माध्यमांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. तसेच समाजातील रूढी-परंपरांबाबत जनजागृती करण्यात आली.

NULM विभागप्रमुख  शशिकांत शिरतोडे यांनी बचत गट कार्यपद्धती आणि ‘पीएम स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी’ (PM SVANidhi) यांसारख्या विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली.

​सभापती सौ. मोहिनी हेंद्रे यांनी नगरपरिषदेच्या ‘संडे बझार’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती देऊन, महिलांनी स्वतः तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांसह या संडे बझारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

​तर, सौ. सुपर्णा अहिवळे यांनी महिलांना स्वतःसाठी वेळ देण्याचे महत्त्व पटवून दिले. कोणत्याही शासकीय योजनेबाबत काही अडचण आल्यास थेट नगरपरिषदेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले, तसेच महिलांच्या समस्या नक्कीच सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली.

​या कार्यक्रमास शहरातील विविध बचत गटांतील महिला प्रतिनिधी आणि एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button