फलटण -फलटण तालुक्यात ठिकठिकाणी रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार आणि संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. चालू हंगामातील हा पहिलाच मोठा आणि समाधानकारक पाऊस असल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फलटण तालुक्यात बऱ्याच दिवसापासून लोकांना पावसाची प्रतीक्षा होती मात्र मानसून पूर्व पाऊस मोठा झालाच नाही त्यामुळे अनेक भागात पिके धोक्यात आली होती जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता प्रशासनाने दुष्काळी उपाययोजना सुरू केल्या होत्या अनेक गावे टंचाईग्रस्त जाहीर केले होते मोठ्या पावसाची लोकांना अपेक्षा होती त्या मानाने पाऊस येत नव्हता. शेतकरी वर्गाचे पावसाकडे डोळे लागून राहिले होते. दररोज ढगाळ वातावरण असायचे मात्र पाऊस यायचाच नाही. मात्र, रात्रीपासून अचानक सुरू झालेल्या या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर चिंब झाला आहे.
या दमदार पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली असून, परिसरात सुखद गारवा पसरला आहे. रात्रीपासून ठीक ठिकाणी पावसाची संततदार सुरू आहे.आज सकाळपासुन पण पावसाची संततधार सुरू आहे.