फलटण — संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर आता नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती आणि उद्योगांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले वीर धरण गुरुवारी (दि. ९) दुपारी ४ वाजेपर्यंत १०० टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सध्या ९.४०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
धरण ओसंडून भरल्याने नवीन ऊस लागवडीला आंबवणी देण्यासाठी हे पाणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे ऊस पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होईल. सिंचनाची उपलब्धता वाढल्याने आगामी काळात ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
वीर धरणात सध्या २२४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे, मात्र सध्या सांडव्यावरून विसर्ग पूर्णपणे बंद आहे.कालव्यातून विसर्ग: वीर धरणातून नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालवा या दोन्ही कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नीरा खोऱ्यातील शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते, मात्र गुरुवारी सकाळपासून हा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
नीरा खोऱ्यातील इतर धरणांची स्थिती:
नीरा खोऱ्यातील चारही प्रमुख धरणांमध्ये मिळून सध्या २९.५७२ टीएमसी (६१.१८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ३४.२८२ टीएमसी (७०.९३ टक्के) इतका होता.
भाटघर धरण: ४५९ मिमी पाऊस झाला असून सध्या ११.३६३ टीएमसी (४८.३५ टक्के) साठा आहे. धरणात २०२ क्युसेक आवक सुरू आहे.
नीरा देवघर धरण: ८७९ मिमी पावसाची नोंद झाली असून ६.६४३ टीएमसी (५६.५४ टक्के) पाणीसाठा आहे. ११२ क्युसेक आवक सुरू आहे.
गुंजवणी धरण: सर्वाधिक ९५५ मिमी पावसाची नोंद झाली असून २.१५८ टीएमसी (५८.४८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. ४८ क्युसेक आवक सुरू आहे.
आगामी काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नीरा खोऱ्यातील इतरही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.