स्थानिक
साधेपणातला मोठेपणा’ पांडुरंगजी पवार यांच्या कार्यातून दिसतो; शिक्षणासाठी उभारलेली संस्था हे मनस्वी कार्य – प्रा. नितीन बानुगडे-पाटील

फलटण : साधेपणातला मोठेपणा काय असतो, हे पांडुरंगजी पवार (भाऊ) यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवते. साधी-साधी माणसं आपल्या कर्तृत्वातून मोठी कामं उभी करतात, याची साक्ष इतिहास वारंवार देत आला आहे. आपल्या मुलांना शिक्षण घेताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला, ते हाल इतरांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, या भावनेतून एका शेतकऱ्याने शिक्षण संस्थेची उभारणी केली आणि पाहता पाहता दोन ज्युनिअर कॉलेज उभी केली, हे निश्चितच मोठे आणि मनस्वी कार्य आहे. शिक्षणाइतकी महत्त्वाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
फलटण-कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि सरस्वती शिक्षण संस्थेच्या १९व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बोलताना प्रा.बानुगडे-पाटील म्हणाले की, समाजामध्ये मोठी पदे भूषविणारे अनेक जण असतात; मात्र आपल्या अनुभवातून समाजासाठी काहीतरी उभे करणारी माणसं वेगळी असतात. पांडुरंगजी पवार (भाऊ) यांनी स्वतःच्या आयुष्यातील शिक्षणाच्या अडचणी केवळ आठवण म्हणून जपल्या नाहीत, तर त्या अडचणींचे रूपांतर इतर मुलांच्या शिक्षणासाठी संधी निर्माण करण्यात केले. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने शिक्षण क्षेत्रात संस्थेची उभारणी करून दोन ज्युनिअर कॉलेजपर्यंतचा प्रवास घडवून आणणे, ही केवळ संस्थेची वाटचाल नसून शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याची प्रक्रिया आहे, ‘आपल्याला जे मिळाले नाही, ते पुढच्या पिढीला मिळावे’ या विचारातून उभे राहणारे कार्यच खऱ्या अर्थाने समाजकार्य ठरते, असेही प्रा. नितीनजी बानुगडे-पाटील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमांचे प्रस्ताविक सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांनी केले.यावेळी त्यांनी भाऊ यांच्या ७५ वर्षांच्या जीवनप्रवासात शेतीपासून शिक्षण क्षेत्रापर्यंतचा प्रवास आणि स्वतःच्या अनुभवातून समाजातील पुढच्या पिढीसाठी उभे केलेले शैक्षणिक कार्य याचा गौरव यावेळी करण्यात आला. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने शिक्षण क्षेत्रात उभी केलेली संस्था आज १९ वर्षांचा टप्पा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाऊ यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नवनाथ कोळवडकर यांनी केले १९ वा वर्धापनदिन आणि अभिष्टचिंतन सोहळा विशेष ठरला.

यावेळी कार्यक्रमास फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे-पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,बजरंग गावडे, धनंजय साळुंखे-पाटील, रणजितसिंह भोसले,अमोल सस्ते,विकास गायकवाड,अरविंद मेहता,सचिन बेडके, राजनकाका देशमुख, विशाल पवार, संध्या गायकवाड, प्रियंका पवार,विविध संस्थांचे पदाधिकारी , पत्रकार , मित्रपरिवार, नातेवाईक आणि दोन्ही स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुणवरे व कोळकी फलटण स्कूलचे पालक देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नवनाथ कोलवडकर यांनी केले.




