फलटण (नसीर शिकलगार ): यंदा राज्यात निर्माण झालेली तीव्र दुष्काळी परिस्थिती, धरणातील घसरलेली पाणीपातळी आणि उसाची घटती उपलब्धता यांमुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एरवी गाळप हंगामाच्या काळात उसाला प्रतिटन चांगला दर (एफआरपी) मिळावा म्हणून आंदोलने आणि घासाघिस करणाऱ्या बळीराजाने यंदा मात्र दराचा हट्ट पूर्णपणे बाजूला ठेवला आहे. ‘दर काय मिळायचा तो मिळो, पण शेतात उभा असलेला ऊस लवकरात लवकर कारखान्याला जावा,’ यासाठी शेतकऱ्यांचा तातडीने आटापिटा सुरू असल्याचे विदारक चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे.
यंदा पावसाने मारलेली ओढ आणि विहिरी-बोअरवेलच्या खालावलेल्या भूजल पातळीमुळे शेतातील उसाला आवर्तन देणे कठीण झाले आहे. कडक उन्हामुळे आणि पाण्याच्या अभावामुळे ऊस वाळू लागला आहे. शेतात ऊस असाच पडून राहिल्यास त्याचे वजन घटेल आणि उत्पादनात मोठा फटका बसेल, या भीतीने शेतकरी हादरले आहेत. त्यामुळे उसाचा ‘तुकडा’ कसाही करून कारखान्यात पोहोचवण्यासाठी शेतकरी ऊस तोडणी टोळ्या आणि कारखाना प्रशासनाकडे आग्रही आहेत.
दराच्या वाटाघाटीत वेळ घालवण्यापेक्षा ऊस वाळण्यापूर्वी गाळप पूर्ण होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.लवकर तोडणी मिळावी यासाठी शेतकरी ऊस वाहतूकदार, मुकादम आणि कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.
उसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पाणी पूर्णपणे संपले आहे. ऊस शेतातच वाळून खाक होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी दराचा विचार करत बसलो तर हातात काहीच उरणार नाही. त्यामुळे कारखाना जो दर देईल तो स्वीकारून ऊस लवकरात लवकर घालवणेचा विचार शेतकरी करीत आहेत.
यंदा उसाचे उत्पादन घटल्याने साखर कारखान्यांनाही पुरेशा उसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे जेवढा ऊस उपलब्ध आहे, त्याचे वेगाने गाळप करून हंगाम लवकर गुंडाळण्याच्या तयारीत कारखानदारही आहेत. पुढील अंगामात तर उसाची उपरवता फारच कमी असणार असल्याने या हंगामात जास्तीत जास्त गाळप करून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्यासाठी कारखानदार प्रयत्नशील असणार आहेत कारण चांगला दर दिला तरच पुढील हंगामात ऊस मिळणार असल्याने यंदाचा हंगाम साखर कारखानदारांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. जेथून ऊस उपलब्ध होईल तेथून लवकरात लवकर ऊस उचलण्यास कारखानदार प्राधान्य देत आहेत.
उसाची या व पुढील हंगामातील उपलब्धता आणि साखर कारखानदारांमधील स्पर्धा पाहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.