स्थानिक

मुख्यमंत्र्यांना नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला बोलवावं लागलं, इतकी वाईट वेळ भाजपावर आली आहे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

फलटण -मुख्यमंत्र्यांना प्रचाराला बोलवावं लागलं, इतकी वाईट वेळ भाजपावर आली असल्याची टीका   पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी फलटणमधील शिवसेनाा उमेदवारांच्या  प्रचार सभेत बोलताना केली. मुख्यमंत्री आले म्हणून आम्ही पण चारजण आलो. चारजण कशासाठी असतात? असा सवाल करत ‘आम्ही खांदेकरी आहोत. ‘राम बोलो भाई राम, बजा दिया काम’, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.

फलटण नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेना मित्र पक्षाच्या  प्रचाराच्या निमित्ताने  विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मंत्री गुलाबराव पाटील मंत्री योगेश कदम, पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार निलेश राणे माजी आमदार दीपक चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर,नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते 

फलटण पालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी दुपारी जाहीर सभा झाली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात टीका करण्याचे टाळले. मात्र, सायंकाळी शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचार सभेत शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री आणि भाजपावर थेट बोचरी टीका केली. आमच्याकडे पण दादा आहेत. पण, आम्ही बायकांच्या लफड्यात पडत नाही. आम्ही पुरूषाशी लढतो, अशी टीका त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा नामोल्लेख टाळून केली. 

महिला डॉक्टर आत्महत्येच्या घटनेसंदर्भात भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, कुठल्या मुलीने, सुनेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात माझं कधी नाव आलं नाही. फलटणमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं. मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने यावे लागले. किती वाईट वेळ आहे. आय लव्ह यू माय मुख्यमंत्री म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर खोचक टीका केली. 

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी देखील भाजपाला इशारा दिला. ते म्हणाले, आम्ही शांत असलो तरी कुणी आरे केलं तर त्याच्या दहा पट आवाजात कारे करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. फलटणमध्ये काही झालं तर रामराजे तुम्ही नुसती हाक मारा. सगळ्या जिल्ह्यातील शिवसैनिक फलटणमध्ये आणू. शिवसेना कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा. पालकमंत्री दम देत नाही. मात्र, कुणी अंगावर आला तर पाठ दाखवून पळ काढणे, ही शिवसेनेची कार्यपद्धती नाही. दहा पावलं पुढे जाऊन चाल करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button