स्थानिक

फलटण नगरपालिकेतील कर घोटाळ्याप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावे किंवा बाजूला सारावे – युवराज शिंदे

फलटण – फलटण नगर परिषदेमधील मालमत्ता कर वसुलीत झालेल्या कथित करोडोंच्या आर्थिक अनियमितता आणि अपहार प्रकरणामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या गंभीर घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे तात्काळ निलंबन करावे किंवा त्यांना पदावरून बाजूला ठेवावे अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज अमृतराव शिंदे यांनी थेट सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना तसेच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेल्या निवेदनात युवराज शिंदे यांनी म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेमधील मालमत्ता कर वसुलीबाबत विविध वृत्तमाध्यमांमध्ये कथित आर्थिक अनियमितता व अपहाराच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. या प्रकारामुळे करदात्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून सार्वजनिक निधीच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असताना, मुख्याधिकारी पदावर राहिल्यास कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी आणि आर्थिक व्यवहारांच्या पुराव्यांमध्ये फेरफार किंवा छेडछाड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करणे किंवा त्यांना तात्पुरते पदावरून बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

 घोटाळ्याशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, ऑनलाईन नोंदी आणि प्रशासकीय निर्णयांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. सार्वजनिक निधीचा अपहार करणाऱ्या आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्व जबाबदार व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल व्हावेत. घोटाळ्याशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे आणि डिजिटल डेटा सुरक्षित ठेवून तो तात्काळ जप्त करण्यात यावा. 

“नगरपरिषदेतील हा कथित कर घोटाळा सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट करणारा आहे. या प्रकरणात कोणतीही राजकीय दबावाची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. जिल्हा प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा मनसे सातारा जिल्ह्याच्या वतीने फलटणमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button