फलटण नगर परिषदेतर्फे पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यास धडाक्यात सुरुवात; सर्वसामान्यांतून समाधान, मात्र “आधी धनदांडग्यांवर कारवाई करा” अशी जनतेची मागणी
फलटण: आषाढी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची धडक मोहीम फलटण नगर परिषदेने हाती घेतली आहे. या कारवाईमुळे रस्ते मोकळे श्वास घेणार असल्याने सामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत असले, तरी “कारवाईत दुजाभाव नको; आधी धनदांडग्यांची अतिक्रमणे काढा,” असा सूर आता नागरिकांमधून उमटू लागला आहे.
दरवर्षी आषाढी वारी दरम्यान फलटण शहरात लाखो वारकरी मुक्कामासाठी आणि दर्शनासाठी येतात. या काळात शहरात मोठी गर्दी होते. मात्र, पालखी मार्गावर आणि मुख्य बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांनी, टपऱ्यांनी आणि दुकानदारांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमणे केली होती. यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. वारीत वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुख्याधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात ही धडक मोहीम सुरू केली आहे. रस्ते अडवून बसलेले हातगाडे, अनधिकृत शेड आणि फलक यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
फलटण शहरातील मलटण भागापासून आज अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त व मोठ्या प्रमाणात नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. काहींची अतिक्रमणे जेसीबी द्वारे पाडण्यात आले तर काहींनी स्वतःहून काढली
रस्ते रुंद आणि मोकळे होत असल्याने पादचारी आणि वाहनधारकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. मात्र, या कारवाई दरम्यान नेहमीप्रमाणे केवळ गरीब, छोटे व्यावसायिक आणि हातगाडी चालकांवरच तात्काळ कारवाई केली जाते, असा आरोप होत आहे. शहरात अनेक ठिकाणी राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या असामींनी, धनदांडग्यांनी आणि इमारतींच्या मालकांनी मुख्य रस्त्यांवर पक्की अतिक्रमणे करून कोट्यवधींचे गाळे आणि पार्किंगच्या जागा लाटल्या आहेत. त्यांच्यावर पण कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच शहरातील इतर भागातील पण अतिक्रमणे काढणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.