स्थानिक
धार्मिक परंपरेला पर्यावरणाची जोड; फलटणमध्ये प्रभाग क्र ११ मध्ये वटपौर्णिमेनिमित्त नगरसेवक संदीप चोरमले यांच्या तर्फे ‘एक महिला – एक वृक्ष’ उपक्रम!

फलटण:— धार्मिक रितीरिवाजांना सामाजिक आणि पर्यावरणपूरक विचारांची जोड देत फलटणमध्ये यंदाची वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पारंपरिक वटपूजनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा ‘एक महिला – एक वृक्ष’ हा स्तुत्य उपक्रम प्रभाग क्र ११ मध्ये राबविण्यात आला.

फलटण नगरपरिषदेच्या नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले यांच्या पुढाकारातून या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वटपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरातील शेकडो विवाहित महिलांना विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. केवळ वडाच्या झाडाची पूजा न करता, प्रत्येक कुटुंबाने घराघरांमध्ये एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, जेणेकरून पर्यावरण रक्षणाला मोठी गती मिळेल, असा विश्वास यावेळी संदीप चोरमले यांनी व्यक्त केला.

श्री स्वामी विवेकानंद नगर आणि नारळी बाग येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात पार पडलेल्या या उपक्रमात अनेक मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

यामध्ये सौ. स्वाती चोरमले, सौ. सोनाली बेडके, विक्रमसिंह शितोळे, अमित बेडके, तसेच सिद्धिविनायक गणेश मंदिराचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, चंद्रकांत दाणी, दिलीप राक्षे, आप्पासाहेब कापसे आणि दिलीप क्षिरसागर आदी उपस्थित होते.
सावित्रीने आपल्या बुद्धी आणि दृढ निश्चयाच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत मिळवल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो. या पौराणिक कथेतील धैर्याचा वारसा जपत, आधुनिक काळात महिलांनी पर्यावरण रक्षणाची धुरा सांभाळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, निसर्ग संवर्धनाचा हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
स्वामी विवेकानंद नगर येथील सिद्धिविनायक मंदिर मध्ये सामाजिक कार्यकर्ते व येथील रहिवासी चंद्रशेखर दाणी यांनी स्वखर्चातून वडाच्या झाडाला सिमेंटचा आकर्षक चौथरा बांधून दिल्याने महिलांना येथे सहजपणे गोल फेऱ्या मारता आल्या.


