फलटण : — दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला फलटण शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि व्यापारी यांनी एकत्र येत फलटण शहर बंद पाळत आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकारावर झालेला हा हल्ला असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा (पूर्व) उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष संदीपभाऊ काकडे, शहराध्यक्ष उमेश कांबळे, पँथरचे महादेव गायकवाड (आप्पा), भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते सर, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष अजित मोरे, तालुका उपाध्यक्ष सुनील पवार, सचिन माने, फिरोज शेख, गोविंद मोरे, युवा पँथरच्या जाधव मॅडम, महिला प. महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास नाळे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीनभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, सिद्धार्थ अहीवळे, अतुल मोहोळकर, अमीरभाई शेख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शांततेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी केली.
फलटण शहरातील हा बंद शांततेत पार पडला असून विविध सामाजिक, राजकीय व विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकजूट दाखवली.
Back to top button
