फलटण -फलटण तालुक्यातील मौजे.गुणवरे येथील आढाव वस्ती परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यंदाही अत्यंत विधायक मार्गाने साजरी करण्यात आली. ‘नाचून नाही तर वाचून’ हा नवा आदर्श समाजासमोर ठेवत, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत मिरवणुकीच्या खर्चाला फाटा दिला आणि महिलांसह भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला.

त्यामुळे प्रबोधन, सामाजिक ऐक्य आणि संविधानिक मूल्यांची जपणूक या त्रिसूत्रींवर साजरा झालेला हा जयंती उत्सव चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे दिखाव्यापेक्षा विचारांना, गोंगाटापेक्षा ज्ञानाला आणि खर्चापेक्षा संस्कारांना महत्त्व देणारा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे.
स्थानिक ग्रामपंचायत आणि पंचशील तरूण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंती सोहळ्यात आढाव वस्ती ते गुणवरे या दरम्यान अतिशय शिस्तबद्ध आणि भव्य अशी डीजे-मुक्त बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि सहभागी सर्व भीम अनुयायांच्या हातामध्ये ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, ‘संविधान हा आपल्या अस्तित्वाचा आधार’, ‘तुमचं आमचं नातं काय? फुले, शाहू आंबेडकर हाय’ यांसारखे घोषवाक्यांसह विविध सामाजिक संदेश देणारे बोर्ड व निळ्या ध्वजांनी सजलेली ही रॅली स्थानिक ग्रामस्थांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. याप्रसंगी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही जयंती असल्याचे म्हटले जात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुकांमध्ये डीजे आणि अनावश्यक बाबींवर मोठा खर्च होतो. हा अनावश्यक खर्च टाळून त्यातून सामाजिक आणि विधायक कामाला हातभार लावावा, या उदात्त उद्देशाने स्थानिक भीम अनुयायांनी ही अनोखी परंपरा राबली आहे. यानिमित्ताने स्थानिक ग्रामपंचायतीत आयोजित अभिवादन सभेत अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून जयंती उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी गावातील लहान मुलांनी हातात ‘शिक्षण हाच खरा विकासाचा मार्ग’, ‘संविधानाचे पालन करा’ यांसारखे विविध प्रबोधनपर फलक घेत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे ही जयंती गावासाठीच नव्हे, तर परिसरासाठीही दिशादर्शक ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती सदस्या वनिता आढाव आणि विविध मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महामानवाच्या जीवनावर आधारित ओघवत्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. या जयंती सोहळ्याला गावातील शिक्षक, ग्रामसेवक, सैनिक, विधिज्ञ, पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन, रेल्वे व बॅंक सेवेतील कर्मचारी, उद्योजक, कृषी अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, व्यावसायिक, पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक महिला, पुरूष, युवक, युवती, जेष्ठ नागरिक आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…म्हणून गुणवरे पॅटर्नची होतेय चर्चा!
भीम जयंतीच्या निमित्ताने ‘डीजे’वर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा, तो पैसा समाजातील गरजू मुलांच्या हातात पुस्तक देण्यासाठी वापरला पाहिजे. वाचनाने विचार प्रगल्भ होतात आणि शिक्षणाचाच समाज उन्नतीचा खरा मार्ग ठरतो. हा बाबासाहेबांचा विचार आहे. याच उपक्रमातून जगता आला पाहिजे, असा विधायक निर्णय विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या स्थानिक सुशिक्षित मंडळींनी घेतला. त्यामुळेच या वर्षी सर्वांच्या एकमताने डीजे-मुक्त, प्रबोधनपर बाईक रॅलीवर शिक्कामोर्तब झाले. नवी पिढी अधिक सुशिक्षित, सक्षम आणि जबाबदार अधिकारी व्हावी, हाच विचार या उपक्रमामागील मुख्य प्रेरणा असल्याचे आयोजकांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे गुणवरेचा हा अनोख्या आणि दिशादर्शक उपक्रम जिल्हाभर कौतुकाचा विषय ठरत आहे.
…तर मूल्ये रूजविणे हेच खरे अभिवादन!
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करून मानवतेचे मूलभूत अधिकार दिले. त्यांनी सामाजिक व आर्थिक समतेची मूल्ये रूजवली. तसेच स्त्री-पुरूष समानतेचा अधिकार प्रदान केला. संविधानातील या मूल्यांची प्रभावी अंमजबजावण तळागाळापर्यंत करणे, हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या वनिता आढाव यांनी केले.
Back to top button
