स्थानिक

अतिक्रमणामुळे फलटण मध्ये ओढ्यांचे श्वास गुदमरले; पावसाच्या तोंडावर पुराचा धोका वाढला!, ओढे नाले बनले कचराकुंडी 

अतिक्रमणांकडे अधिकारी आणि नेतेमंडळींचे सोयीस्कर दुर्लक्ष; नागरिक भितीच्या छायेखाली

फलटण -{नसीर शिकलगार }-पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना फलटण शहर आणि उपनगरातील ओढ्या-नाल्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ओढ्यांच्या पात्रात झालेली बेसुमार अतिक्रमणे आणि साचलेला कचरा यामुळे यंदा शहराला मोठ्या पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही महसूल प्रशासन, नगरपालिका आणि स्थानिक नेतेमंडळींनी ‘मौन’ धारण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फलटण शहरातून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांच्या पात्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी ओढ्यांचे पात्र संकुचित करून त्यावर पक्की बांधकामे, रस्ते आणि भिंती उभारण्यात आल्या आहेत.अनेक गैरप्रकार घडले आहेत.

अतिक्रमनामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला आहे.अतिक्रमणांमुळे पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत.अनेक वर्षांपासून ओढ्यांची स्वच्छता न झाल्याने पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ आणि झाडेझुडपे वाढली आहेत.शहरातील आणि जवळील गावातील सांडपाणी आणि प्लॅस्टिक कचरा थेट ओढ्यात टाकला जात असल्याने पात्र तुडुंब भरले आहे. 

 प्रशासन ओढ्यांच्या बाबतीत मात्र कमालीचे सुस्त दिसत आहे. तक्रारी करूनही अधिकारी केवळ ‘सर्वेक्षण करू’ अशी थातुरमातूर उत्तरे देत आहेत. दुसरीकडे अनेक बड्या नेतेमंडळींनी या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

“जर यंदा अतिवृष्टी झाली, तर ओढ्याचे पाणी शेजारील वस्त्यांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधुन उमटत आहेत.

मागील वर्षी २२ मे ला फलटण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती अनेक ओढे, नाले फुल भरून वाहत होते. ओढ्याच्या कडील गावामध्ये तसेच घरामध्ये पाणी घुसून नागरिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते.याची दखल घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी ओढ़े नालेसफाई बाबत आक्रमक भूमिका घेणे गरजेचे होते मात्र त्यांनी चुप्पीच साधली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button