स्थानिक

गजानन चौक ते महात्मा फुले चौक पालखी रस्त्याचे काम बंद पडले, उकरलेले रस्ते आणि धुरळ्याच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण

फलटण : फलटण शहरात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या संथ आणि नियोजन नसलेल्या कामामुळे फलटणकर सध्या नरकयातना भोगत आहेत. ठेकेदाराने ‘एक रस्ता पूर्ण करून मगच दुसरा रस्ता हातात घेणे’ या नियमाला हरताळ फासत संपूर्ण शहरात जागोजागी रस्ते उकरून ठेवले आहेत. त्यातच आता गजानन चौक ते महात्मा फुले चौक दरम्यानचा उकरलेला रस्ता अचानक काम बंद पडल्याने ‘जैसे थे’ अवस्थेत असून, या मार्गावर धुरळा आणि खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे.

*फलटण पोलीस ठाण्यासमोर दीड वर्षापासून काम रखडले!*

धक्कादायक बाब म्हणजे, फलटण पोलीस स्टेशनसमोरून दीड वर्षांपूर्वी सुरू केलेले रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ रखडलेले आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे गेल्या महिन्यात उकरलेला गजानन चौक ते महात्मा फुले चौक परिसरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आधीच आर्थिक मंदी सोसणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे.

*नागरिकांचा संतप्त सवाल*

 फलटण शहरात  रस्त्याच्या अर्धवट कामाबाबत एवढा उच्छाद मांडणाऱ्या आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या या ठेकेदाराला वचक कोणाचाच नाही का? प्रशासन यावर गप्प का आहेत ? असा सवाल नागरिक करत आहेत 

*धुरळ्याचे साम्राज्य वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात*

सध्या या उकरलेल्या रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून वाहनचालकांना जावे लागत आहे. वाहने गेल्यानंतर हवेत उडणाऱ्या धुळीच्या प्रचंड लोटामुळे पादचाऱ्यांना श्वास घेणे कठीण झाले असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अपघात आणि आजारपणाचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.जे रस्ते अत्यंत रहदारीचे आणि मुख्य बाजारपेठेला जोडणारे आहेत, त्यांचे काम युद्धपातळीवर आधी पूर्ण करावे, अशी तीव्र मागणी फलटणमधील नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गातून केली जात आहे.

 प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button