स्थानिक

बकरी ईद पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न 

फलटण : मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण शांततापूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्यात सोमवारी शांतता समिती बैठक पार पडली. 

    उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक उपस्थित होते. 

    यावेळी दि. २८ मे रोजी साजऱ्या होत असलेल्या बकरी ईद निमित्त नगर परिषदेकडून तात्पुरता परवाना घेऊनच कत्तलखाने सुरु ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गाय, वासरु किंवा खोंड यांची कत्तल कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

      कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे प्रकार आढळल्यास शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार संबंधित व्यक्तींविरुद्ध मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला. तसेच संबंधितांना बीएनएसएस कलम १६८ अन्वये नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

       तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी फलटणची शांतताप्रिय आणि सर्वधर्म समभाव जपणारी ओळख कायम राखण्याचे आवाहन केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच धार्मिक विधी पार पाडावेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

  प्रारंभी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button