स्थानिक

फलटणमध्ये तरुण दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी वाढली, मोठ्या आवाजात हॉर्न वाजविणे, फटाक्याचे आवाज काढणे आरडा ओरड करणे नित्याची बाब. नागरिक त्रस्त, पोलीस सुस्त

फलटण – फलटण शहरातील गजबजलेल्या भागात आणि गल्लीबोळात दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी कमालीची वाढली असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि पादचारी पुरते त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यांवरून हॉर्नचा मोठा आवाज आणि फटाक्याचा आवाज काढत जाणाऱ्या हुल्लडबाजांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील माळजाई परिसर, गिरवी नाका आणि गजबजलेल्या भागात रात्रीच्या वेळी तरुणांचे टोळके दुचाकीवरून आरडाओरडा करत आणि वेडीवाकडी वाहने चालवत जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या हुल्लडबाजीमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अनेक दुकानांसमोर होणाऱ्या या गोंधळामुळे स्थानिक व्यापारी आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेले महिला आणि नागरिक या हुल्लडबाजांकडे हताशपणे आणि संतापाने पाहत असतात. सायलेन्सर चे किंवा फटाक्यांचे मोठे मोठे आवाज काढत ओरडत जाणे नित्याची गोष्ट झाली आहे. अनेक अल्पवयीन मुले सुद्धा ट्रिपल सीट बसवून वेगात वाहने चालवत आहेत. अशावेळी परिवहन विभाग आणि पोलिसांनी दक्ष असणे गरजेचे असताना ते गरजेच्या वेळी दिसतच नाहीत. 

रात्रीच्या वेळी रस्त्यावरून शांततेत चालणेही कठीण झाले आहे. सायलेन्सरचा मोठा आवाज करत आणि टोळ्या करून फिरणाऱ्या या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात पोलिसांची गस्त वाढवून अशा टवाळखोरांवर आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता फलटणकरांमधून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button