स्थानिक

फलटण तालुक्यात पाणीबाणी! ५१ गावांत टंचाई घोषित; ५ गावे व २७ वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू

​फलटण : उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे, किंबहुना यावर्षी उन्हाळी पाऊस अजिबात न झाल्याने फलटण तालुक्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तालुक्यातील तब्बल ५१ गावांमध्ये टंचाई परिस्थिती घोषित केली आहे. यापैकी ५ गावे आणि २७ वाड्या-वस्त्यांवरील लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.

​विशेष म्हणजे, टंचाई घोषित आणि टँकर सुरू करण्यात आलेल्या गावांमध्ये तालुक्यातील बागायती पट्ट्यातील गावांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने अशीच ओढ दिली, तर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यावर्षी ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे पाऊसमान कमी म्हणजेच केवळ ९२ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे टंचाईची तीव्रता अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.

​असे जाहीर झाले टंचाईग्रस्त टप्पे:

​२३ फेब्रुवारी २०२६ (३३ गावे): धुळदेव, झिरपवाडी, सोनवडी बुद्रुक, सोनगाव, माळेवाडी, शिंदेमाळ, आंदरुड, नांदल, ढवळेवाडी (आसू), टाकळवाडे, मानेवाडी, मिरगाव, दऱ्याचीवाडी, मिऱ्याचीवाडी, दालवडी, कोऱ्हाळे, कापडगाव, पवारवाडी, ताथवडा, चौधरवाडी, फरांदवाडी, बिबी, वाघोशी, पिराचीवाडी, जिंती, आळजापूर, आदर्की बुद्रुक, मलवडी, ठाकूरकी, हनुमंतवाडी, मठाचीवाडी, होळ.

​३० मार्च २०२६ (१० गावे): खामगाव, ढवळ, झडकबाईचीवाडी, जावली, कापशी, टाकूबाईचीवाडी, मिरढे, सरडे, आदर्की खुर्द आणि हिंगणगाव.

​५ जून २०२६ (९ गावे): गोळेगाव पुनर्वसन, जाधवनगर, तांबवे, वडगाव, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, दुधेबावी आणि वडले.

​या गावांना आणि वाड्यांना टँकरचा आधार:

​दिनांक ६ जून २०२६ पासून तालुक्यातील खालील गावे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे:

१. दुधेबावी व ११ वस्त्या

२. वाघोशी ३. सासवड व ५ वस्त्या

४. मानेवाडी व ४ वस्त्या

५. मिरढे व ७ वस्त्या

​पावसाचा पत्ता नसल्याने आणि भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना म्हणून टँकर सुरू केले असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचा विश्वास प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button