स्थानिक
प्रशासनाचा कागदोपत्री खेळ; दुष्काळी जनतेची चेष्टा की टँकर घोटाळा?,फलटण तालुक्यात टँकर न पोहोचताच कागदावर मात्र पाणी फेसाळले; वाघोशी ग्रामस्थांचा खळबळजनक खुलासा!

फलटण (नसीर शिकलगार ): फलटण तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने ५१ गावांमध्ये टंचाई घोषित केली आहे. यामध्ये ५ गावे आणि २७ वाड्यांवर टँकर सुरू झाल्याचा दावा प्रशासनाकडून छातीठोकपणे केला जात असतानाच, प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये टँकरचा पत्ताच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांचा हा निव्वळ कागदोपत्री खेळ असून, यामागे मोठा ‘टँकर घोटाळा’ असण्याचा संशय व्यक्त होत आहे. दुष्काळी जनतेच्या या थट्टेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
प्रशासनाचा दावा फोल; ‘रक्षक रयतेचा’च्या वृत्तानंतर सत्य आले समोर
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ६ जून २०२६ पासून तालुक्यातील दुधेबावी (व ११ वस्त्या), वाघोशी, सासवड (व ५ वस्त्या), मानेवाडी (व ४ वस्त्या) आणि मिरढे (व ७ वस्त्या) येथे शासकीय टँकर सुरू करण्यात आले आहेत. याबाबतची वृत्त विविध वृत्तपत्र, न्यूज चॅनेल मध्ये प्रसिद्ध होताच, **’रक्षक रयतेचा न्यूज’**कडे वाघोशी व इतर वस्त्यांमधील ग्रामस्थांनी संपर्क साधून प्रशासनाचा खोटेपणा उघडा पाडला. वाघोशी गावात प्रत्यक्षात एकही टँकर पोहोचला नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
महिनाभरापासून पत्रव्यवहार, पदरी मात्र उपेक्षाच!
विशेष म्हणजे, वाघोशी ग्रामस्थ मागील एक महिन्यापासून पाण्याचा टँकर मिळावा यासाठी प्रशासनाकडे सातत्याने लेखी निवेदन देत आहेत, पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, महिनाभर ढिम्म राहिलेल्या प्रशासनाने आता थेट टँकर सुरू झाल्याचा ‘कागदी’ अहवाल सादर केला आहे. जर टँकर गावात आलेच नाहीत, तर मग कागदावर फिरणारे टँकर नेमके कुठे रिकामे होत आहेत? टँकर फेऱ्यांचे पैसे लाटण्यासाठी हा बनाव रचला गेला आहे का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
“आम्ही पाण्यासाठी महिनाभर पत्रव्यवहार करतोय आणि अधिकारी सांगतात टँकर सुरू झाले! गावात पाण्याचा थेंब नाही, मग कागदावरचे टँकर कोणाची तहान भागवत आहेत? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशा भावना संतप्त वाघोशी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या
सखोल चौकशीची मागणी; जनता आक्रमक
टंचाईग्रस्त भागातील जनतेला पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत असताना, अधिकारी वर्ग एसी केबिनमध्ये बसून आकड्यांचा खेळ खेळत आहे. टँकर सुरू केल्याचे भासवून शासकीय निधी हडप करण्याचा हा प्रकार असल्याचा दाट संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी फलटण तालुक्यातील टंचाईग्रस्त जनतेने केली आहे.
आम्ही दिनांक 25 मे पासून लेखी स्वरूपात टँकरची मागणी केली आहे. विविध शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत.मात्र आज अखेर आमच्या गावात टँकर आलेला नाही आमच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.
— ताराचंद उत्तम पवार{ सरपंच वाघोशी }


