स्थानिक

फलटण शहरातील प्रत्येक रस्ता उजळणार; आधुनिक एलईडी पथदिव्यांच्या कामाला गती – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण — फलटण शहरातील नागरिकांना सुरक्षित, प्रकाशमान आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फलटण नगर परिषदेकडून आधुनिक एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच उपनगरांमध्ये नव्या पथदिव्यांची उभारणी सुरू असून, लवकरच संपूर्ण शहर अधिक प्रकाशमान होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

 माळजाई मंदिर रस्ता परिसरात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक पथदिव्यांच्या ट्रायल प्रसंगी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, नगरसेवक रोहित नागटिळे, नगरसेवक पप्पू शेख, महाराजा मल्टीस्टेटचे चेअरमन रणजितसिंह भोसले, भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष रियाजभाई इनामदार, भाजपचे अमोल सस्ते, सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “शहरातील कोणताही रस्ता अंधारात राहू नये, ही नगर परिषदेची भूमिका आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने सर्व भागांमध्ये दर्जेदार वेगळे एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे वीज बचत होण्यासोबतच शहराचे सौंदर्यही वाढणार आहे.”

नागरिकांकडून पथदिव्यांबाबत येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून, बंद असलेले दिवे दुरुस्त करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे बसविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपर्क फलटण शहर आणि तालुका बदलत आहे. विविध विकास कामांनी वेग घेतलेला आहे. फलटण बदलत चालले आहे. विकासाच्या बाबतीत अग्रेसर असणारे सुंदर आणि स्वच्छ फलटण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या दोन वर्षात फलटण शहर बारामती प्रमाणेच बदललेले दिसेल अशी ग्वाही यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी देऊन येत्या दोन ते तीन दिवसात अधिकृत रित्या प्रत्यक्ष पथ दिव्यांचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित पथ दिवे बसविणारे ठेकेदार, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button