स्थानिक
फलटणमध्ये भ्रष्ट कारभाराचा बळी? निकृष्ट दर्जाच्या पथदिव्याचा नवीन खांब कोसळून दोन शेतकरी गंभीर; संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे धाडस प्रशासन दाखवणार की आर्थिक लाभासाठी गप्प बसणार???

फलटण — :फलटण मध्ये प्रशासनाचा अकार्यक्षम कारभार आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठला आहे! येथील शासकीय विश्रामगृहासमोरील आठवडा बाजार परिसरात नव्याने उभारलेला पथदिव्याचा खांब रविवारी अचानक कोसळल्याने दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. नवीनच बसविलेले नवनवीन खांब पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून “दोषी ठेकेदाराला तातडीने काळ्या यादीत (Blacklist) टाका!” अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.

पालखी महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणासह सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत नव्याने आकर्षक पथदिवे बसवण्याचे काम सुरू आहे. रविवारी आठवडा बाजाराच्या गर्दीच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहासमोरील असाच एक पथदिव्याचा खांब अचानक थेट भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत दोन शेतकरी रक्तबंबाळ आणि गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली आणि संदीप चोरमले यांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.
काही दिवसांपूर्वीच फलटण एस.टी. बसस्थानकासमोर बसचा किरकोळ धक्का लागताच एक खांब कोसळला होता. आता पुन्हा एकदा आठवडा बाजाराच्या दिवशी खांब कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा परवाना ठेकेदाराला कोणी दिला?,पायाभूत मजबूतीकरण न करताच खांब उभे केले जात आहेत का?केवळ बिल लाटण्यासाठी हा निकृष्ट दर्जाचा कारभार सुरू आहे का?पालखी केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सर्व दिवे का बंद आहेत असा संतप्त सवाल जनतेमधून आता उपस्थित होऊ लागला आहे.
केवळ चौकशीचे सोंग आणून या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाल्यास जनता गप्प बसणार नाही. भविष्यात असा भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण?त्यामुळे केवळ कागदी घोडे न नाचवता:संबंधित कंत्राटदारावर तात्काळ गुन्हे दाखल करा.ठेकेदाराला कायमस्वरूपी ‘काळ्या यादीत’ (Blacklist) टाकण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.


