स्थानिक

यापूर्वी ज्या पद्धतीने साखरवाडी कारखान्याचा फुगा फुटला त्याच पद्धतीने आज ना उद्या त्यांच्या उपळवेच्या कारखान्याचा पण फुगा फुटणार – आ. रामराजे नाईक निंबाळकर

श्रीराम कारखान्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार

फलटण – आमचे विरोधक श्रीराम कारखान्यांमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही कधीही स्वराज कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही मात्र यापूर्वी ज्या पद्धतीने साखरवाडी कारखान्याचा फुगा फुटला त्याच पद्धतीने आज ना उद्या त्यांच्या उपळवेच्या कारखान्याचा पण फुगा फुटणार असून सत्तेच्या माध्यमातून बँकांना लुबाडून पैसे दुसरीकडे वळविण्याचा त्यांचा धंदा सुरू आहे. अशी जोरदार टीका विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर केली. यावेळी त्यांनी या वयात न्यायासाठी रस्त्यावर पण उतरण्याची घोषणा केली.

कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित ‘श्रीराम’च्या सभासदांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

“एखाद्या माजी खासदाराला खूश करण्यासाठी सत्तेचा गैरवापर होणार असेल, तर गप्प बसणार नाही. ‘श्रीराम’ कारखान्याची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, न्याय ओरबाडून घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरा मी पण तुमच्याबरोबर या वयात सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे असे आक्रमक आवाहन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. 

रामराजे यांनी विरोधकांना आणि प्रशासनाला थेट इशारा देताना सांगितले की, “जर तालुक्यातले सर्व सभासद एकत्रितपणे रस्त्यावर आले, तर या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वतः करू. वेळ पडली तर १० हजारांपेक्षा जास्त सभासदांचा मोर्चा काढून प्रांत कार्यालयावर धडक देऊ आणि तिथे जाऊन प्रसंगानुरूप पुतळेही जाळावे लागतील!” ‘श्रीराम’चे १२ ते १४ हजार सभासद जर प्रशासनाच्या दारात उभे राहिले, तर प्रशासनालाच काय, पण थेट सरकारलाही त्याची दखल घ्यावीच लागेल, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

आ.रामराजे म्हणाले की, हा कारखाना जेव्हा आम्ही ताब्यात घेतला, तेव्हा आर्थिक समीकरणांचा विचार केला नव्हता; तर मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरू केलेला हा कारखाना त्याच वैभवात चालवणे हाच आमचा उद्देश होता. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला, तरी आम्ही जनतेला वाऱ्यावर सोडलेले नाही. मात्र, जर जनता गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणार असेल, तर आमच्याही आयुष्याला मर्यादा आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 जुने दिवस परत आणायचे असतील, तर सभासदांनी शेअर्सची १५ हजार रुपयांची रक्कम पूर्ण करावी. सभासदांकडून १२ कोटी रुपये जमल्यास, उर्वरित कर्ज सातारा बँकेतून देण्याची जबाबदारी रामराजेंनी स्वतः घेतली.

श्री दत्त व श्रीराम हे दोन्ही कारखाने एकत्रित आल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. ‘श्री दत्त’ कारखाना प्रति टनामागे ४०० रुपये जास्त देत असल्याने विरोधकांना ते नको आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 फलटण तालुक्याला विकासाच्या बाबतीत आपण नवी दिशा दिली. तीस वर्षे विकासापासून वंचित तालुका आपण प्रगतीपथावर आणला. सुडाचे राजकारण संपविले. श्रीराम कारखाना व साखरवाडी कारखाना चांगला चालवून दाखविला. निरा देवघर धोम बलकवडीचे पाणी तालुक्यात आणले. कमीन्स सारखा मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. तालुक्यासाठी आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले एवढे करून पण तुम्ही विरोधकांच्या हाती सत्ता दिली असली तरी आम्ही तालुका सोडून गेलेलो नाही. तालुक्याच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू असेही आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट करताना यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले .

 यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर आदींची भाषणे झाली.

या बैठकीला ‘श्रीराम’चे संचालक मंडळ, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष खटके यांनी केले, सूत्रसंचालन शरद रणवरे यांनी तर आभार सुखदेव बेलदार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button