स्थानिक

ज्यांच्या घरात नगरसेवक पद होते, त्यांनीच गजानन चौकातील झाडे हटविण्याचा ठराव सूचित करून मंजूर केला होता – नियोजन व विकास समिती सभापती संदीप चोरमले यांचा आरोप

जखम डोक्याला अन मलम गुडघ्याला”; नगरसेवक संदीप चोरमले यांचा टोला

फलटण : गजानन चौकातील जीर्ण झाडे हटविण्याच्या मुद्द्यावरून शहरात राजकीय वातावरण तापले असून, समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेला आता थेट आरोप-प्रत्यारोपांचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती संदीप चोरमले यांनी माजी नगरसेविका वैशाली चोरमले यांच्यावर गंभीर आरोप करत, “झाडे हटविण्याचा ठराव त्यांच्या कार्यकाळातच मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आता घेतली जाणारी भूमिका म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत,” अशी टीका केली आहे.

गजानन चौकातील काही झाडे जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने ती हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मात्र, नगरसेवक संदीप चोरमले यांनी पत्रकारांशी बोलताना संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी विरोधकांवरच पुराव्यानिशी टाकली आहे.

ते म्हणाले की, “ज्यांच्या घरात नगरसेवक पद होते, त्यांनीच गजानन चौकातील झाडे हटविण्याचा ठराव सूचित करून मंजूर केला होता. त्या ठरावाच्या आधारे संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे आता त्या रस्त्यावर असलेल्या चौक, झाडे किंवा इतर बाबींवर नगरपालिका प्रशासनाला थेट निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.”

नगरसेवक संदीप चोरमले यांनी दावा केला की, रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आता काहीजण जाणीवपूर्वक विकासकामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. “आज जे लोक पर्यावरणाच्या नावाखाली आंदोलन करत आहेत, त्यांनीच पूर्वी हा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे त्यांची भूमिका ही ‘जखम डोक्याला अन मलम गुडघ्याला’ या म्हणीसारखी आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण संवर्धनाचा मुद्दाही पुढे आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आगामी पावसाळ्यात फलटण शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिम राबविण्याचा मानस असल्याचे संदीप चोरमले यांनी सांगितले.“शहरात शेकडो देशी प्रजातींची झाडे लावण्यात येणार असून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर निश्चित केली जाणार आहे. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संरक्षण आणि संवर्धन यालाही प्राधान्य दिले जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, “ज्यांना झाडांबद्दल खरोखरच तळमळ आहे, त्यांनी विकासकामात अडथळे निर्माण करण्याऐवजी वृक्ष संगोपनासाठी पुढाकार घ्यावा,एकीकडे झाडे काढण्याचा ठराव करायचा आणि दुसरीकडे झाडे काढू नका असे सांगायचे ” असा टोला लगावत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.गजानन चौकातील झाडांचा मुद्दा आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित न राहता राजकीय रंग घेऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात या प्रकरणावरून शहरातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button