स्थानिक

अतिथी देवो भव’,माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जपली राजकीय सभ्यता; स्टेजखाली बसलेल्या विद्यमान खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना सन्मानाने स्वतःच्या शेजारी बसविले 

 फलटण: -राजकारणात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात राजकीय सभ्यतेचे आणि नेते मंडळीमधील माणुसकीचे दर्शन घडवणारी एक सुखद घटना पाहायला मिळाली. 

स्टेजच्या खाली बसलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विरोधक आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाहून, माजी खासदार रणजितसिंह नाईक यांनी त्यांना तात्काळ स्वतःजवळ स्टेजवर बोलावून आपल्या शेजारी मानाचे स्थान दिले. या प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये ‘अतिथी देवो भव’ या उक्तीची चर्चा रंगली आहे.

 आळंदी ते पंढरपूर मार्गाच्या पाहणीसाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे प्रवास करत सुरवडी( तालुका फलटण) येथे निसर्ग हॉटेलमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी थांबले होते.यावेळी आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग च्या अधिकाऱ्यांनी छोटे स्टेज सजवून पाठीमागे स्क्रीन द्वारे पालखी मार्गाची माहिती दिली होती. यावेळी स्टेजवर बसण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजूबाजूला  चार ते पाच खुर्च्या होत्या. यावेळी शिष्टाचारानुसार विद्यमान खासदारांचे आसन स्टेजवर असणे अपेक्षित होते, परंतु काही कारणास्तव ते स्टेजच्या खाली बाजूच्या रांगेत बसले होते. ही बाब स्टेजवर उपस्थित असलेल्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लक्षात येताच, त्यांनी कोणताही राजकीय मतभेद आड न आणता मनाचा मोठेपणा दाखवला.माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः उठून आपल्या गावांत आलेल्या विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना स्टेजवर येण्याचा आग्रह केला आणि त्यांना आपल्या शेजारी सन्मानाने बसवून घेतले.

आजच्या काळात जिथे राजकीय चढाओढ शिगेला पोहोचली आहे, तिथे अशा प्रकारे एकमेकांचा आदर राखणे ही बाब सर्वांसाठीच आदर्श ठरणारी आहे. “पद येते आणि जाते, पण जपलेली नाती आणि सभ्यता कायम राहते,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button