फलटण – आ.श्रीमंत रामराजे व दीपक चव्हाण यांनी आणलेले शहर विकासाचे २५ कोटी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या नावावर खपवले असा आरोप पत्रकाद्वारे राजे गटाचे दादासाहेब चोरमले यांनी केला आहे.
गजानन चौकातील झाडे हटविण्याच्या जुन्या ठरावावरून सुरू झालेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले असून, दादासाहेब चोरमले यांनी याबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. पाच वर्षांपूर्वी नगरपरिषदेचा कार्यकाळ संपत असताना मोठ्या प्रमाणात विविध विकासकामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. त्याच काळात गजानन चौकातील सुशोभीकरणासाठी झाडे हटविण्याचाही एक ठराव झाला होता आणि त्यावर सूचक म्हणून सौ. वैशाली चोरमले यांचे नाव नोंदविण्यात आले होते.
याबाबत बोलताना दादासाहेब चोरमले म्हणाले की, “त्या काळातील परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. नगरपरिषदेचा कार्यकाळ संपत असताना अनेक ज्येष्ठ नगरसेवकांकडून विविध विकासकामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. त्या प्रक्रियेत हा ठराव झाला असेल आणि सूचक म्हणून सौ. वैशाली चोरमले यांचे नाव लिहिले गेले असेल. त्या वेळचे विरोधक असणारे विरोधी पक्ष नेते , गटनेते व इतर नगरसेवक आणि आजचे सत्ताधारी, सन्माननीय नगराध्यक्ष साहेब यांनाही ही वस्तुस्थिती माहिती आहे.”
ते पुढे म्हणाले, “तत्कालीन परिस्थितीत त्या ठरावाची अंमलबजावणी झाली असती, तरी आमचा त्याला विरोधच राहिला असता. कारण तो ठराव आम्ही मांडलाच नव्हता जाणीवपूर्वक त्या ठरावला सौ वैशाली चोरमले यांचे सूचक म्हणून नाव टाकले होते हे आम्हाला आज समजत आहे. आम्ही नेहमी निसर्गावर प्रेम करणारे व वृक्ष संवर्धन वृक्ष लागवडीसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत कारण आज जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता पर्यावरणाला हानी पोहोचवून कोणताही विकास आम्हाला मान्य नाही. याच भूमिकेतून आज मी आणि माझी पत्नी सौ. वैशाली चोरमले शहरातील जुनी व मोठी झाडे काढण्यास ठाम विरोध करीत आहोत.”
चोरमले यांनी स्पष्ट केले की, “आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करीत नाही. त्या काळात श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते टोपी चौक परिसराचे सुशोभीकरण करण्याचा मोठा प्रकल्प प्रस्तावित होता. त्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला होता. तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी शहर विकासासाठी मंजूर करण्यात आला होता.”
त्यांनी पुढे आरोप केला की, “त्या कामांसाठी काही प्रमाणात टेंडर नोटिसाही निघाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले आणि हा निधी माघारी पाठविण्यात आला. त्यानंतर त्याच कामांची नावे बदलून आम्ही आणलेलाच निधी पुन्हा फिरवून आणण्यात आला. याबाबत नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाने खुलासा करणे गरजेचे आहे.”
दरम्यान, झाडांच्या ठरावाचा उल्लेख करून टीका करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “त्या ठरावाचा जसा गाजावाजा केला जात आहे, तसाच आम्ही आणलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचाही गाजावाजा करावा. आम्हाला कोणत्याही विषयाचे राजकारण करायचे नाही. शहराचा विकास व्हावा हीच आमची भूमिका आहे. चांगल्या विकासकामांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील,” असेही दादासाहेब चोरमले यांनी स्पष्ट केले.
गजानन चौकातील झाडांच्या मुद्द्यावरून आता शहरातील राजकीय वातावरण तापले असून, विकास आणि पर्यावरण यामधील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.