स्थानिक
फलटणमध्ये सूर्याचा ‘रुद्र’ अवतार; पारा ४२ अंशांवर, नागरिक उकाड्याने हैराण, रस्ते ओस

रक्षक रयतेचा न्यूज नेटवर्क :
फलटण:- गेल्या काही दिवसांपासून फलटण शहर आणि परिसरात उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून, आज तापमानाने ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. सूर्याच्या या तीव्र प्रकोपामुळे संपूर्ण शहर अक्षरशः होरपळून निघाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत असल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे अनेकांना उन्हाचे चटके सहन करत आपले कामकाज करावे लागत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहे.
रस्ते ओस:
दुपारच्या वेळी बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. अनेक व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसत आहेत तीव्र उखाड्यामुळे बाजारपेठेवर पण चांगलाच परिणाम झाला आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक बाहेर जाणे टाळत आहेत.
शीतपेयांना मागणी
उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, उसाचा रस, ताक आणि शहाळ्याच्या पाण्याचा आधार घेत आहेत.
पशू-पक्षांचे हाल:
वाढत्या तापमानाचा फटका मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही बसत असून, ठिकठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
तापमान ४२ अंशांवर गेल्याने ‘उष्माघाताचा’ (Heat Stroke) धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
१. पुरेसे पाणी प्या: तहान नसली तरीही दिवसातून ठराविक अंतराने पाणी पीत राहा.
२. बाहेर जाणे टाळा: दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
३. संरक्षणात्मक साधने: बाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्री आणि सनग्लासेसचा वापर करा. शक्यतो सुती आणि हलके कपडे परिधान करा.
४. लक्षणे ओळखा: चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त ताप आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
येत्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा हा पारा असाच चढा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे फलटणकरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
