फलटण –गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने होरपळून निघालेल्या फलटणकरांना आज वरुणराजाने मोठा दिलासा दिला. शहरासह उपनगरांमध्ये आज सायंकाळी अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, महिनाभरापासून सुरू असलेल्या असह्य उष्णतेपासून नागरिकांची मुक्तता झाली आहे.
सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता, मात्र पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभरहुन अधिक काळ चाललेल्या या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. रस्त्यावरील धूळ वाहून गेली होती. हवेत गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली, मात्र उष्णतेचा तडाखा कमी झाल्याने चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.