स्थानिक
फलटण-दहिवडी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; धूळ आणि निकृष्ट कामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात, नवीन रस्त्यावर पाणी सुद्धा मारले जात नाही

रक्षक रयतेचा न्यूज नेटवर्क
फलटण {नसीर शिकलगार }:फलटण ते दहिवडी या मुख्य मार्गाचे सुरू असलेले काम सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून, हा रस्ता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. रस्त्याच्या कामात होत असलेला कमालीचा निष्काळजीपणा आणि अत्यंत दर्जाहीन (निकृष्ट) साहित्याचा वापर यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक अपघात होऊन सुद्धा संबंधित प्रशासनाला जाग येत नाही.

फलटण ते दहिवडी या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग मार्फत सुरू आहे जुना रस्ता उकरून नवीन रस्ता केला जात आहे तसेच रस्त्याचे रुंदीकरण सुद्धा केले जात आहे हे काम करत असताना कोणत्याही पद्धतीचे सुरक्षितेचे उपाय योजना नाही. रस्त्यावर जागोजागी दगडी पसरलेली असून त्यावर रोलिंगचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच प्रचंड धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने गंभीर अपघात घडत आहेत. पाणी मारले जात नसल्याने धूळ प्रचंड झाली असून नाका,तोंडात, डोळ्यात धुळ घुसत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे, मात्र तिथे कोणतेही बॅरिकेड्स किंवा रात्रीच्या वेळी चमकणारे दिशादर्शक लावलेले नाहीत. अंधारात वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे एखाद्या नवीन वाहन चालक रस्त्याने आल्यास त्याचा अपघात होत आहे
नवीन केलेला सिमेंट रस्त्यावर वारंवार पाणी मारले पाहिजे तसेच त्यावर पोती अंथरून त्या पोत्यांवर पाणी मारले गेले पाहिजे मात्र वरच्यावर पाणी मारले जात असून काही वेळेस पाणी मारण्यास सुद्धा संबंधित ठेकेदाराला वेळ मिळत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळेस तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. अनेक दुचाकीस्वार येथे पडून जखमी झाले आहेत. ठेकेदार आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कोणाचे बळी जाण्याची वाट पाहत आहे का?”असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
फलटण ते विटा रस्त्याचे काम फक्त फलटण तालुक्यात म्हणजे दुधेबावी (मोगराळे) घाटाखालीच संथ गतीने सुरू आहे. विटा ते दहीवडी हे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आले आहे तर दहीवडी पासून घाटा पर्यंत ची एक बाजू जवळपास पूर्ण झाली आहे.फलटण तालुक्यात मात्र गेल्या वर्षभरापासून फारशी प्रगती दिसून येत नाही.प्रशासनाने रस्त्याच्या दर्जाकडे आणि सुरक्षितेकडे तातडीने लक्ष देऊन या ‘मरणयातना’ थांबवाव्यात, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


