स्थानिक

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे

फलटण  : – अनेकदा पालक आपल्या मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विविध क्षेत्रांमध्ये करिअरची निवड करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे अनेक मुले-मुली अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखणे गरजेचे असून, त्यानुसार त्यांना शिक्षण व योग्य मार्गदर्शन दिल्यास मुले आपल्या आवडीच्या क्षेत्रात निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे यांनी केले.

खांडज, ता. बारामती येथील ब्रिलीयन्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी सचिन मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था प्रमुख तानाजी जाधव गुरुजी, डॉ. सुभाष गुळवे, दिलीप देवकाते, मुख्याध्यापिका सौ. सीमा जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. मुलांना शिस्त लावताना केवळ उपदेश करण्यापेक्षा पालकांनी स्वतः त्या गोष्टी आचरणात आणून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा, असे सचिन मोरे यांनी सांगितले. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे गुण व क्षमता असतात. ते ओळखून विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा व दिशा देणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे काम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सचिन मोरे म्हणाले की, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे. अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या त्यागामुळे आपण आज मुक्त भारतात सन्मानाने जगत आहोत. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही; मात्र त्यांच्या विचारांवर चालून त्यांना खरी आदरांजली वाहू शकतो.

खांडज सारख्या ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम स्कूल उभी करून ती यशस्वीपणे चालविणे हे निश्चितच कौतुकास्पद व धाडसाचे काम असल्याचे सांगत त्यांनी संस्था व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

यावेळी डॉ. सुभाष गुळवे यांनी विद्यार्थ्यांना पालक व गुरुजनांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. आजच्या काळात मोबाईल व सोशल मीडियाचा वापर आवश्यक असला तरी त्याचा विवेकाने वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. वेळेचे नियोजन करा, चांगली पुस्तके वाचा, शिक्षकांचा आदर करा, पालकांचा सन्मान करा आणि ध्येयासाठी सातत्याने मेहनत घ्या. अपयश आले तरी खचून जाऊ नका; कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे त्यांनी सांगितले.

मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

देवांश निखिल बुरुंगले, सानिका विराज घाडगे,आदिती दत्ता आटोळे शिवन्या अजित गोसावी, निमय मानसिंग जाधव, विरप्रताप तानाजी जराडे, पार्थ सुनिल जाधव, काव्या विवेक सुर्यवंशी, देवा वसंत गावडे श्रेयश सुग्रीव मंडलकर, स्वरा राहूल ढवळे, प्रमय मानसिंग जाधव, आराध्या मालोजी जाधव, श्रेया राहूल ढवळे या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती वर भाषणे केली व विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास तानाजी जाधव, ॲड.किरण कांबळे विवेक सूर्यवंशी, जयप्रकाश आटोळे, सोमनाथ जरांडे, भाऊ पोंदकुले, सुभाष भंडलकर, काका व्यवहारे, मामा हरिहर यांच्यसह पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका सौ. सीमा जाधव  यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.अमृता झिंगरे  यांनी केले व आभार सौ. सुप्रिया सोरटे  यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button