स्थानिक
ग्रामीण जीवनाच्या मातीतून उमललेल्या कवितांना ‘रानपाटी’चे रूप रविंद्र आण्णा नाळे यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते प्रकाशन

पुणे : ग्रामीण जीवन, मातीचा सुगंध, बालपणीच्या आठवणी, नातीगोती, संघर्ष आणि माणुसकीच्या भावविश्वातून साकारलेल्या काव्यभावनांना ‘रानपाटी’ या पहिल्या कवितासंग्रहातून शब्दरूप मिळाले आहे. फलटण तालुक्यातील वनदेवशेरी येथील रविंद्र आण्णा नाळे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते झाले.

रविंद्र नाळे हे स्थापत्य अभियंता असून फेरोक्रिट डोम कन्स्ट्रक्शन या व्यवसायात कार्यरत आहेत. कविता लेखनाची आवड त्यांना शालेय जीवनापासूनच होती. त्यांनी लिहिलेल्या कविता मित्रांना पाठवत असत. शाळेतील मित्रांना त्यांच्या कविता आवडू लागल्या आणि मित्रांच्या आग्रहातूनच आपल्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आकाराला आली.
‘रानपाटी’ या कवितासंग्रहाच्या निर्मितीच्या प्रवासात त्यांच्या मित्रांचे मोलाचे योगदान लाभले. शशांक पाटील यांनी आर्थिक मदतीची जबाबदारी सांभाळली, शर्मिला चव्हाण यांनी पुस्तकाच्या सजावटीसाठी मोलाची मदत केली, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल सोनावणे यांनी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विशेष प्रयत्न केले. मित्रांच्या या सहकार्यामुळे नाळे यांच्या कवितांना पुस्तकाचे रूप मिळाले आणि त्यांचे स्वप्न साकार झाले.
‘रानपाटी’च्या मनोगतातून नाळे यांनी आपल्या बालपणीच्या ग्रामीण जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. गावातील माती, शेतातील काम, आई-वडिलांचे संस्कार, गावातील साधेपणा, कष्ट आणि माणुसकी यांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये उमटले आहे. त्यामुळे ‘रानपाटी’ हा केवळ कवितासंग्रह नसून ग्रामीण जीवनाच्या अनुभवांची, संवेदनांची आणि माणुसकीच्या नात्यांची काव्यमय पाऊलवाट असल्याचे जाणवते.
‘रानपाटी’ या शीर्षक कवितेतही ग्रामीण परिसरातील रान, माती, पाऊलवाट, शेत आणि निसर्ग यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. साध्या-सोप्या भाषेत ग्रामीण जीवनातील वास्तव आणि भावविश्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहातून करण्यात आला आहे.
आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल रविंद्र आण्णा नाळे यांनी मित्र, सहकारी, वाचक आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ‘रानपाटी’च्या या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम आणि प्रोत्साहन सदैव स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.कवी : रविंद्र आण्णा नाळे हे वनदेवशेरी, कोळकी, (ता. फलटण, जि. सातारा) येथील रहिवाशी आहेत.त्यांचा फेरोक्रिट डोम कन्स्ट्रक्शन या नावाने व्यवसाय आहे.




