स्थानिक

पदवीधर उमेदवार गायब, पक्ष गप्प; फलटणमधील ‘सुशिक्षित’ मतदार वाऱ्यावर!, मतदार विचारतात उमेदवार कोण ते तरी सांगा, प्रचाराचा थंड फराळ

उमेदवारच फलटणला विसरले, सर्व पक्षीय यंत्रणा पण ठप्प

 फलटण(नसीर शिकलगार )– पुणे पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी फलटण तालुक्यात मात्र निवडणूक प्रचार यंत्रणा थंड आहे. सुशिक्षित मतदारांना उमेदवार कोण हेच कळेना झाले आहे. अनेक पक्ष निवडणूक लढवीत असताना पक्षाची यंत्रणा पण थंड आहे. उमेदवार गायब, पक्ष गप्प; फलटणमधील ‘सुशिक्षित’ मतदार वाऱ्यावर! अशी परिस्थिती फलटण तालुक्यात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अगदी अंतिम टप्प्यात आली असून राजकीय पक्षांच्या दाव्यांची हवा गरम होत आहे. मात्र, फलटण तालुक्यात या निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे ‘थंड’ पडला आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी तालुक्यातील एकाही प्रमुख उमेदवाराने मतदारांचे तोंड पाहिलेले नाही, ना पक्षांची काही यंत्रणा सक्रिय झाली आहे. परिणामी, “निवडणूक नक्की आहे का? आणि उमेदवार तरी कोण आहेत?” असा थेट सवाल विचारत पदवीधर मतदार चक्रावून गेले आहेत. 

फलटण तालुक्यात एकाही पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवाराचा प्रचार सुरू झालेला नाही. पत्रके वाटणे, प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे तर दूरच; साधे फ्लेक्स किंवा डिजिटल प्रचारही तालुक्यात दिसलेला नाही. 

निवडणूक काळात पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते गल्लीबोळ पिंजून काढतात. मात्र, या निवडणुकीबाबत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे. यामुळे पदवीधरांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. 

फलटण तालुक्यात हजारो सुशिक्षित पदवीधरांनी नावनोंदणी केली आहे. परंतु, उमेदवारांच्या या निष्काळजीपणामुळे कुणाला मतदान करायचे, हा पेच मतदारांसमोर निर्माण झाला आहे. सोशल मीडिया वरून सुद्धा कोणालाच मेसेज किंवा एसएमएस सुद्धा येत नाहीत. इतकी यंत्रणा उमेदवारांची ढेपाळली आहे. 

“आम्ही मोठ्या उत्साहाने नाव नोंदवले. पण आता निवडणुकीचा प्रचारच दिसत नाही. उमेदवार कोण, त्यांच्या मागण्या काय, हेच आम्हाला माहीत नाही. ही सुशिक्षित मतदारांची एक प्रकारे थट्टाच आहे. अशा प्रतिक्रिया पदवीधर तरुण व्यक्त करीत आहेत

पुणे पदवीधर मतदारसंघ हा पाच जिल्ह्यांचा मोठा भाग व्यापतो. त्यामुळे उमेदवार केवळ पुणे किंवा मोठ्या शहरांमध्येच केंद्रित राहून ग्रामीण भागातील तालुक्यांकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता मतदानाचा दिवस जवळ येत असताना, अंतिम टप्प्यात तरी हे उमेदवार फलटणमध्ये फिरकणार की मतदारांना ‘वाऱ्यावरच’ सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button